

06713, jsp2820
जयसिंगपूर: अवकाळी पावसाने शेतात साचून राहिलेले पाणी. (छायाचित्र: संदीप खामकर, जयसिंगपूर)
- दानोळी : येथे पाऊस झाल्याने शेतात तुटलेला ऊस वहातुक करून भरावा लागला.
...
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज दुपारनंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जनेसह ठिकठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऊस तोडणी आणि भात मळणीवर परिणाम झाला असला तरीही रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे.
...
इचलकरंजीत आठवडा बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ
इचलकरंजी ः शहरात आज दुपारी कोसळलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. अनेक भागात गटारी तुंबल्याने पाणी घाणीसह रस्त्यावर परसले होते. विकली मार्केट परिसर पाणी घुसल्याने आठवडा बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. विशेषतः छोट्या विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. कुरुंदवाडे मळा व राजराजेश्वरीनगरमध्ये घरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साचलेल्या पाण्याला मार्ग काढून दिला. अनेक मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळत राहिला. त्यामुळे पाहता पाहता अनेक भागातील गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. सोबत गटारीतील घाणही रस्त्यावर पसरली. विशेषतः राजर्षी शाहू हायस्कूल परिसरातील परिस्थिती विदारक होती. या शिवाय मेन रोडवरील लायकर गल्ली कॉर्नर, आमराई रोड, चांदणी चौक, मोठे तळे, लालनगर आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. काही सखल भागात पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. विकली मार्केटमध्ये आज आठवडी बाजार भरला होता. अवकाळी पावसाने येथील विक्रेत्यांचे मोठे हाल झाले.
...
अवकाळी पावसाने ऊसतोडीवर ‘पाणी’
दानोळी ः परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नुकताच ऊस तोडीला सूर लागला होता, त्याच्यावर या पावसाने पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांना पाऊस आवश्यक होताच. मात्र या पावसाने ऊसतोडीवर परिणाम होणार आहे. दानोळी, कोथळी, कवठेसारसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. जयसिंगपर, यड्राव आदी भागातही दमदार पाऊस पडल्याने ऊसतोडीत अडचण होत आहे.
...
कुरुंदवाड परिसराला झोडपले
कुरुंदवाडः शहर व परिसराला आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानकपणे पडलेल्या पावसाने शेत-शिवारात पाणीच पाणी झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भट्टीवरील कामगार आणि ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरल्याने परिसर चिखलमय होऊन जनजीवन विस्कळित झाले.
....
......
अवकाळीने वाढवली ऊस हंगामापुढील चिंता
ढगांच्या गडगडाटासह पाऊसः तोडीचे नियोजन विस्कळीत
जयसिंगपूर,ता.२८ः शिरोळ तालुक्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकत्याच सुरु झालेल्या ऊस हंगामापुढे चिंता निर्माण झाली आहे. तालुक्याच्या बहुतांश भागाला अवकाळीने झोडपून काढले. ढगांच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने ऊस हंगामापुढे गाळपाच्या उद्दीष्टपूर्तीचा प्रश्न निर्माण झाला. आधी ऊस दराच्या आंदोलनाने तीन आठवडे लांबलेल्या गाळप हंगामापुढे आता अवकाळीमुळे व्यत्यय निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे साखर कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वर्तविली जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश आदी शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्याने तीन आठवडे कारखाने बंद आहेत. काही कारखान्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी वाहने पेटविण्याबरोबर वाहने पलटी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांनीही धोका न पत्करता ऊस तोडी नाकारल्या. आंदोलनाचा हंगामावर परिणाम झाला. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. उसाची वाढही म्हणावी अशी झाली नाही. शिवाय लांबलेला हंगाम यामुळे कारखानदार आणि शेतकऱ्यांना ऊसाची चिंता होती. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हंगाम सुरळीत होईल असे वाटत असतानाच मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने हंगामापुढे पुन्हा चिंता निर्माण केली आहे. पावसाने तोडीला आलेल्या उसाच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. अद्याप कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरु झाला नाही. मजूर, वाहनांची जुळवाजुळव आदी कारखानदारांची धावपळ सुरु आहे. अवकाळी पावसाने मात्र हंगामाच्या आशेवर पाणी सोडले आहे. ऊस तोडीची क्रमपाळी बदलून जाणार आहे. रस्त्यालगतचा ऊस तोडण्यावर भर द्यावा लागणार असला तरी उसाने भरलेली वाहने शेताबाहेर काढण्याची कसरतही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मंगळवारच्या पावसाने किमान आठवडाभर तरी ऊस तोडीचे गणित बसणार नाही अशी स्थिती आहे. शिवाय आणखी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी आणि कारखानदारांपुढे चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.