लॅप्रोस्कोपी समज गैरसमज

लॅप्रोस्कोपी समज गैरसमज
Published on

लेखास अनुसरून फोटो वापरावा.

लॅप्रोस्कोपी समज-गैरसमज

लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीतून) शस्त्रक्रिया आहे तरी काय?
डॉक्टरांकडे गेल्यावर एखाद्या आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले तर प्रथम पोटात भीतीचा गोळा येणे स्वाभाविकच आहे; पण लॅप्रोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया करू, असे सांगितले की, डॉक्टर तेवढे नको असे अनेकदा ऐकायला मिळते. कारण त्याबद्दलचे अनेक प्रश्न, गैरसमज हे स्वयंघोषित डॉक्टर, सोशल मीडियावर शास्त्राधार नसलेले लेख यातून ऐकलेले अथवा वाचलेले असतात. तेच दूर करण्यासाठी या लेखाचे प्रयोजन.
* लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय?
लॅप्रोस्कोपिक सर्जरीला मिनिमल इनव्हेसिव सर्जरी अथवा की होल सर्जरी (छोट्या छिद्रातून) असेही म्हणतात. दुर्बिणीच्या सहाय्याने छोट्या छिद्राद्वारे शरीरातील प्रामुख्याने पोटातील अवयव तपासणे, त्यांच्या आजारांचे निदान करणे आणि केलेल्या निदानानुसार त्यावर शस्त्रक्रिया करणे म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी होय.
* लॅप्रोस्कोपी कधी करता येते?
तसे पाहता लॅप्रोस्कोपीचा आवाका खूप मोठा आहे. अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, गर्भाशय, हर्निया, जठर, आतड्यांचे कर्करोग, गर्भधारणांच्या समस्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वेटलॉस शस्त्रक्रिया, पित्ताच्या आजारांसंबंधित शस्त्रक्रिया याशिवाय सोनोग्राफी/ सी.टी. स्कॅनमध्ये निदान होऊ न शकलेल्या आजारांच्या निदान प्रक्रियेमध्येही लॅप्रोस्कोपी करतात.
* लॅप्रोस्कोपी सर्जरी आणि ओपन सर्जरीमधील फरक काय?
पूर्वी तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ओपन सर्जरी केली जात असे. यामध्ये रुग्णाच्या पोटावर ८ ते १० सेंटिमीटर अथवा गरजेनुसार अधिक छेद/कट देऊन, जवळजवळ पूर्ण पोट उघडून शस्त्रक्रिया केली जात होती; पण लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये ०.५ ते १ सेंटिमीटर असे २ ते ४ छेद देऊन दुर्बिणीच्या सहाय्याने स्क्रिनवर पाहून पोटातील अवयवांचे सूक्ष्म निरीक्षण, निदान आणि यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे.
* लॅप्रोस्कोपीचे फायदे काय?
यामध्ये कमीत कमी रक्तस्त्राव होतो. शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी वेदना जाणवतात. जखम लवकर भरून येते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज भासत नाही. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन तो दैनंदिन काम करू शकतो. कमीत कमी जंतू संसर्गाचा धोका.
* लॅप्रोस्कोपीबद्दलचे-तथ्य आणि मिथ्य
मिथ्य (गैरसमज)-लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रायोगिक आहे.
तथ्य- विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जात आहे. वर्षानुवर्षे तंत्रज्ञान आणि तंत्रांमधील प्रगतीने ही शस्त्रक्रिया एक सुस्थापित आणि व्यापकपणे वापरली जाणारी शस्त्रक्रिया पद्धत बनली आहे.
मिथ्य (गैरसमज) -ही शस्त्रक्रिया फक्त साध्या व सोप्या शस्त्रक्रियेसाठीच आहे.
तथ्य-अपेंडिक्स, पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेपासून ते अगदी कर्करोग, अवयव प्रत्यारोपण यांसारख्या जटील शस्त्रक्रिया प्रगत कौशल्य आणि साधने याद्वारे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया अचूक केल्या जातात.
मिथ्य -लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया अधिक वेदनादायक असते.
तथ्य- लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेनंतर सामान्यतः खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी वेदना होतात. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेदरम्यान केलेल्या लहान छेदांमुळे रुग्णांना कमी वेदना होतात आणि वेदनाशामक औषधांची आवश्यकता कमी भासते.
मिथ्य- लॅप्रोस्कोपी हे ओपन शस्त्रक्रियेपेक्षा जास्त धोकादायक आहे.
तथ्य- असंख्य लॅप्रोस्कोपीबद्दलच्या अभ्यासातून दर्शवले आहे की, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी गुंतागुंत, कमी संसर्ग आणि जलद दैनंदिन कामास सुरुवात ही त्याची बलस्थाने आहेत. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सुरक्षित मानली जाते.
मिथ्य -लॅप्रोस्कोपी ही प्रत्येकासाठी योग्य नाही.
तथ्य-लॅप्रोस्कोपी हे एक अष्टपैलू तंत्र आहे. मोजके अपवाद वगळता प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी व विविध आजारांवर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करता येते.
मिथ्य -लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेने आजारावर यशस्वी उपचार होऊ शकत नाहीत.
तथ्य-ओपन पद्धतीने आणि लॅप्रोस्कोपिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रियांचा परिणाम आणि यशस्वी होण्याचे प्रमाण तसेच हे प्रमाण समसमान आहे. तसेच तंत्रज्ञान आणि पद्धती वेगळी असली तरी शस्त्रक्रिया ही तीच केली जाते. त्यामुळे लॅप्रोस्कोपी पद्धतीने यशस्वी उपचार होतात हे अनेक वर्षांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
मिथ्य-लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ओपन शस्त्रक्रियेपेक्षा महाग असते.
तथ्य-सुरुवातीला लॅप्रोस्कोपिक उपकरणे आणि प्रशिक्षण खर्चामुळे लॅप्रोस्कोपी महाग वाटू शकते. तथापि रुग्णालयातील कमी मुक्काम आणि जलद दैनंदिन कामास सुरुवात लक्षात घेता दीर्घकाळात खर्चात लक्षणीय बचत करू शकते. निष्कर्ष : लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया या पद्धतीने खूप लांबचा पल्ला गाठला आहे. ज्याने तिची सुरक्षितता, परिणामकारकता दाखवून अनेक मिथकांना दूर केले आहे. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीस शस्त्रक्रिया लागत असल्यास किंवा लॅप्रोस्कोपीबद्दल प्रश्न असल्यास एखाद्या योग्य तज्ज्ञ सर्जनचा सल्ला घ्या, जो तुम्हाला विशिष्ट गरजांवर आधारित सर्वांत अचूक माहिती आणि मार्गदर्शन देऊ शकेल.

डॉ. ऋषीकेश कुलकर्णी
एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जन)
कन्सल्टंट, लॅप्रोस्कोपी ॲण्ड इंडोस्कोपी सर्जन.

-------------------------
(पुरवणी संकलन- संदीप जगताप)
जाहिरात संपर्क-दत्ता टोणपे- ९८८११२९२७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com