दाखला कुणबीचा

दाखला कुणबीचा

लोगो कालच्या टुडे २ वरून घेणे

दाखला कुणबीचा...भाग - २

जातीच्या नोंदीतील
शेऱ्यांनी गोंधळ
ओबीसी दाखला देण्याच्या अंमलबजावणीचा खेळखंडोबा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जन्म-मृत्यूच्या रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या केलेल्या नोंदींवरून संभ्रमावस्था आकाराला आली आहे. ‘कुणबी’ ही जात गृहित धरून तिचा इतर मागासवर्गीयांत (ओबीसी) समावेश केला असताना, त्या माहितीपासून बहुतांशी मराठा समाज अनभिज्ञ राहिला आहे. त्यातही जातीच्या नोंदीतील शेऱ्यांनी, तर अधिकच गोंधळ निर्माण केल्याचे चित्र आहे. जुन्या कागदपत्रांच्या वाचनातून ते स्पष्ट होते. शासनाच्या २००४ च्या परिपत्रकान्वये कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांना ओबीसी म्हणून दाखला द्यावा, असे जाहीर केले असताना त्याच्या अंमलबजावणीचा मात्र खेळखंडोबा आहे.
शाहूवाडीतील जन्म-मृत्यूच्या रजिस्टरमध्ये १९४३ मधील शेरा पाहिला असता, त्यात जात कोष्टकात कुणबी असे दाखल न करता मराठा लिहावे, असे म्हटले आहे. तत्पूर्वी, १९४२ च्या शेऱ्यात जात बरोबर नमूद केली नसून, मराठा लिहावे, असा उल्लेख आहे. त्याहीपुढे जाऊन जात कोष्टकात लिहिलेल्या ‘कु’ जातीचा खुलासा करावा, असेही म्हटले आहे. तालुक्यातील मौजे कोतोलीत कोंडी बाबू मराठा असे नाव असून, त्याची जात कुणबी लिहिली आहे. ही नोंद १९२९ ची आहे. विशेष म्हणजे १८६५ मध्ये पाटण तालुक्यातील एका व्यक्तीची जात कुरवाडी असून, त्यांच्या वारशांची नोंद कुणबी केली आहे.
राज्यातील जातींच्या नोंदीचा आढावा घेता यलम मराठा, जय मराठा, वायदेशी मराठा, खानदेशी मराठा, मराठा बेळगाव, मराठा ख्रिस्ती, सह्याद्री मराठा, क्षत्रिय मराठा, बौद्ध मराठा, मराठा तेली, आगरी मराठा, कोकणी मराठा, गुजराती मराठा अशा नोंदी दिसून येतात, असे मोडी लिपी तज्ज्ञ वसंत सिंघण सांगतात.
------------------
चौकट
२००४ च्या शासन परिपत्रकात मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावे, असे म्हटले आहे. मात्र, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशी संयुक्त नोंद कोठेही दिसून येत नाही. काही ठिकाणी अपवाद असू शकेल. त्यामुळे त्यातील मराठा कोण व कुणबी कोण, हे स्पष्ट होत नसल्याने त्याबाबत स्पष्टीकरण व्हावे, असे पत्र कुणबी समाज सेवा संस्थेतर्फे २०२३ ला तत्कालीन मंत्र्यांना पाठविले होते. त्याचे उत्तर अद्याप आले नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
-------------------
कुणबी समाज सेवा संस्थेने उपस्थित केलेले प्रश्‍न
- १९२० पूर्वी जो कुणबी होता. त्याच्या मुलांना मराठा अशी जात लावली. याला जबाबदार कोण? त्यांची जात कोणती समजावी? त्याचा खुलासा शासनाने करावा.
- बऱ्याच ठिकाणी १९२० पुढील पुरावे मागतात. मग १९२० पूर्वी काय घडले. त्या पूर्वीचे पुरावे खोटे समजावेत काय?
- जात सिद्ध करण्यासाठी अंतिम जात पडताळणी समिती तपास करून जात प्रमाणपत्र देते. मग तहसिलदार, प्रांत नेमकी कोणती भूमिका पार पाडतात? त्यांनी प्रस्ताव नाकारला तर समितीकडे अपील करावे लागते.
- १८८५ ते १८९५ दरम्यान जन्म-मृत्यू नोंद मिळाल्यास त्या सालचा महसूल पुरावा मिळत नाही. त्यामुळे त्या नोंदी पुरावा म्हणून नाकारल्या जातात. मग काय करावे?
- मोडीतील पुराव्यांचे लिप्यांतर कोणी करायचे? शासकीय कर्मचारी मोडी येत नसल्याचे कारण सांगतात.
- शासन अधिकृत मोडी तज्ज्ञांची तहसिलदार कार्यालयात नेमणूक कधी करणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com