प्रत्येक शनिवारी प्रत्यक्ष निसर्गचित्रण

प्रत्येक शनिवारी प्रत्यक्ष निसर्गचित्रण

56320
कोल्हापूर ः येथील चित्रकारांनी एकत्रित येऊन प्रत्येक शनिवारी प्रत्यक्ष निसर्गचित्रणाला प्रारंभ केला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपात त्यांनी प्रत्यक्ष निसर्गचित्रण केले.

प्रत्येक शनिवारी प्रत्यक्ष निसर्गचित्रण!
युवा चित्रकारांचा पुढाकार; कलापूरच्या परंपरेला पुन्हा मिळणार उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची परंपरा आता पुन्हा युवा चित्रकारांनी सुरू केली आहे. प्रत्येक शनिवारी ही मंडळी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष निसर्गचित्रण करू लागली आहेत. गेली महिनाभर हा उपक्रम सुरू असून, आज ऐतिहासिक भवानी मंडपात त्यांनी हा उपक्रम राबवला. पस्तीसहून अधिक चित्रकारांचा या उपक्रमात समावेश आहे.
येथील चित्रकलेला मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यासाठी योगदान दिले आहे. ही चळवळ अधिक नेटाने पुढे नेताना अनेक संकल्पनाही येथे रुजल्या. पूर्वी सर्व मंडळी एकत्रित येऊन रेखाटने, प्रत्यक्ष निसर्गचित्रण करायचे आणि सर्वांच्या कलाकृतींवर चर्चाही व्हायची. रेखाटनाची चळवळ अजूनही सुरू आहे. पण, प्रत्यक्ष निसर्गचित्रणाचा उपक्रम काही वर्षे बंद होता. तो आता यानिमित्ताने पुन्हा सुरू झाला आहे.
प्राचार्य अजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय टिपुगडे, अभिजित कांबळे, प्रवीण वाघमारे, आरिफ तांबोळी, विजय उपाध्ये, प्रकाश मोहिते आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
-------------
चौकट
कलाकृतींबाबत मंथनही
प्रत्येक शनिवारी सकाळी एखाद्या ठिकाणी ही मंडळी एकवटतात. निसर्गचित्रणाची स्थळे निश्‍चित करतात. त्यानंतर रेखाटन करूनच निसर्गचित्रण पूर्ण करतात. विशेष म्हणजे निसर्गचित्रण पूर्ण झाल्यानंतर सर्व मंडळी प्रत्येकाच्या कलाकृतींबाबत मंथनही करतात. यापूर्वी तुळशी धरण, पंचगंगा घाट, संध्यामठ आदी परिसरात हा उपक्रम झाला. येत्या शनिवारी (ता. १३) पुन्हा पंचगंगा घाटावर हा उपक्रम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com