लाल बावटा बांधकाम संघटनेतर्फे कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा
62916, 62914
....
बांधकाम कामगारांना वस्तूंऐवजी पैसे द्या
लाल बावटा बांधकाम संघटनेचा कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : वस्तू नको पैसे द्या, जेवण नको पैसे द्या, सर्व योजनांचा लाभ एक महिन्यात द्या, यासह अन्य मागण्यांसाठी आज लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या सर्व मागण्या १५ फेब्रुवारीपूर्वी मंजूर कराव्यात. तसे आदेश काढावेत. अन्यथा, १६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढून आक्रोश केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर मार्गे गोकुळ हॉटेल ते शाहूपुरी, पहिल्या गल्लीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर येऊन धडकला. ‘बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना ताबडतोब सुरू करा, ठेकेदारांना पोसणाऱ्या योजना बंद करा, बांधकाम कामगारांना वस्तूंऐवजी पैसे द्या, ६० वर्षांवरील बांधकाम कामगारांना पेन्शन द्या, लाभाचे स्लॉट ओपन करा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून महिला, पुरुष कामगार मोठ्या संख्येने सामील झाले. तरसंबळे (राधानगरी) येथील शाहीर समाधान कांबळे आणि सहकाऱ्यांनी लाल बावट्याच्या क्रांतिकारी गाण्यांनी मोर्चाची स्फूर्ती वाढवली. ढोलकीचा ठेका, डफ आणि दैवावर नागशेष शिरावर, पृथ्वी पेलली ज्यांनी करावर, त्या विश्वाच्या स्थितीगतीचा, कामगार हा कणाकणा,’ अशा गाण्यांनी कामगारांत चैतन्य भरले. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर ट्रॅक्टरवरच मंच उभा करून सभा घेण्यात आली. यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना निवेदन दिले. यावेळी घोडके म्हणाले, ‘मागण्यांचे निवेदन कामगार विभागाच्या सचिवांकडे पाठविले जाईल. स्थानिक पातळीवरील जे विषय असतील, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल.’
संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, सहसचिव शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, दिलीप माने, आशा संघटनेतर्फे उज्ज्ववला पाटील, संगीता पाटील, कविता पाटील यांची यावेळी भाषणे झाली. मोहन गिरी यांनी आभार मानले,
...
संघटनेच्या मागण्या अशा ...
-रक्त तपासणी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे मेडिक्लेम योजना सुरू करा.
-जुने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज तपासून तत्काळ लाभ द्या.
-कार्यालयाकडील लाभाचे स्लॉट कायमस्वरूपी ओपन करा.
-६० वर्षांवरील कामगारांना महिना पाच हजार रुपये पेन्शन द्या.
-खराब झालेल्या रेशन कार्डसाठी ऑनलाईन प्रिंट ग्राह्य धरावी.
-कामगारांच्या खात्यावर पाच हजार रुपये टाका.
-अवजारे खरेदी योजना पुन्हा सुरू करा.
-बोगस नोंदणीला आळा घाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.