कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाला. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार डी. राजा, दिलीप पोवार, सुभाष जाधव, राजीव आवळे, सत्यजित पाटील, विजय देवणे, स्मिता पानसरे, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, प्रा. जयंत आसगावकर, शमशुद्दीन मुश्रीफ, उदय नारकर, राजू सावंत, बाजीराव खाडे, मधुकर रामाणे, वसंत मुळीक आदी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाला. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार डी. राजा, दिलीप पोवार, सुभाष जाधव, राजीव आवळे, सत्यजित पाटील, विजय देवणे, स्मिता पानसरे, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, प्रा. जयंत आसगावकर, शमशुद्दीन मुश्रीफ, उदय नारकर, राजू सावंत, बाजीराव खाडे, मधुकर रामाणे, वसंत मुळीक आदी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)esakal

Sharad Pawar: "देशातील परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून व्हावी" पवारांनी केले गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

हा संघर्ष केवळ निवडणुकीपूरता नाही तर तो सर्व पातळ्यांवर करावा लागेल.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः केंद्रातील सत्ताधाऱ्यांना पुरोगामी विचारांमध्ये आस्था नाही. सत्तेचा वापर ते राजकारणासाठी करतात. विरोधात बोलणाऱ्यांना ते तुरुंगात टाकतात. कोल्हापूरने नेहमीच पुरोगामी विचारांना साथ दिली. राजर्षी शाहू महाराज यांचा संदेश याच नगरीतून देशभर पोहोचला. राजर्षींचा विचार श्रीमंत शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे नेला. ही परिवर्तनाची भूमी असून, आताही देशातील परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून व्हावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे केले. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, ‘देशातील सत्ताधाऱ्यांचा विचार वेगळा आहे. ते, सत्तेचा वापर राजकारणासाठी करतात. त्यांच्या विरोधात जे बोलतील त्यांच्यामागे ईडी लावून तुरुंगात टाकतात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. पुरोगामी विचार संपवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या करण्यात आल्या. त्यांच्याकडे विचार नाही म्हणून त्यांना कायदा हातात घ्यावा लागतो. पुण्यात ‘निर्भय बनो’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांवरही हल्ला केला. विचारांचा विरोध विचारांनी केला पाहिजे. यासाठी समतेच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यांनी संघर्ष उभारला पाहिजे. हा संघर्ष केवळ निवडणुकीपूरता नाही तर तो सर्व पातळ्यांवर करावा लागेल.’’

ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर नेहमीच परिवर्तनाची भूमी राहिली आहे. राजर्षी शाहू यांच्या समतेचा विचार याच भूमीतून देशभर गेला. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करावा, हे देशाला दाखवून दिले. अशा कोल्हापूरच्या भूमीतून देशातील परिवर्तनाची सुरुवात व्हावी.’’

अध्यक्षीय भाषणात श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, ‘‘पानसरे आपल्यात नसले तरी त्यांचा विचार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार त्यांनी पुढे नेले. आज आपण एका वळणार आलो आहोत. देशातील वातावरण दूषित आहे. डॉ. आंबेडकर यांनी बनवलेली घटना कोणी मोडू शकणार नाही; पण त्यातून पळवाटा शोधल्या जातात. पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट काढूनच राज्यात सत्ताबदल झाला.

७५ वर्षांत कधीही महाराष्ट्र इतका अस्थिर नव्हता, तो आता झाला आहे. सगळी गुंतवणूक गुजरातला नेली जाते आणि राज्याला तुकडे टाकले जातात. देशातील या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रतिकार करावा लागेल. कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो. आपली दिशा ठरलेली आहे. त्याचप्रमाणे आपण करायचे.’’

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘संतांनी समतेचा विचार दिला. हाच पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे नेला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या विचारधारेतील सर्वांनी याच विचाराला समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवले. जो त्रास संतांना झाला तोच पासरेंनाही झाला. पानसरे यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला म्हणूनच त्यांची हत्या झाली. देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे.’’
रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा, राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, उमा पानसरे, स्मिता पानसरे, मेघा पानसरे, बन्सी सातपुते आदी उपस्थित होते.

स्मारक प्रेरणा देईल!
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्याविषयी श्री. पवार म्हणाले, ‘‘पानसरे यांची नगर ही जन्मभूमी तर कोल्हापूर कर्मभूमी. या दोन्ही जिल्ह्यांनी पुरोगामी, साम्यवादी विचारांना नेहमीच उचलून धरले. राजर्षी शाहूंच्या या नगरीत पानसरे यांनी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून दिला. त्यांचे विचार स्पष्ट आणि तर्कसुसंगत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुस्तकाच्या रुपाने मांडले. हे पुस्तक अन्य भाषांमध्येही प्रकाशित झाले व त्याच्या आजही आवृत्या निघत आहेत. कॉम्रेड पानसरे यांचे स्मारकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहे. यामध्ये ते आणि त्यांचे सहकारी, कष्टकरी संघर्षाच्या भूमिकेत आहेत. हीच भूमिका त्यांनी आयुष्यभर जोपासली. हे स्मारक प्रेरणा देण्याचे काम करेल.’’

कोल्हापुरात ठिणगी, देशात वणवा!
प्रास्ताविकात आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘पानसरे यांचे स्मारक उभारण्याचे भाग्य मला मिळाले. माझ्या आयुष्यातील जी काही चांगली कामे झाली, त्यातील हे एक आहे. अशी माणसे आपल्यात नाहीत, हे दुर्दैव आहे. दाभोलकर ते कलबुर्गी यांच्यापर्यंतच्या हत्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. सत्ताधारी देशाला एका वेगळ्या दिशेला नेत आहेत. विचारांचे प्रदूषण आपल्याला थांबवावे लागेल. आता रणांगण फार दूर नाही. कोल्हापुरात ठिणगी पडली की देशात वणवा पेटतो. आपण कोणाला हात द्यायचा, हे ठरवावे लागेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com