''नालबंदी''चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

''नालबंदी''चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

भाग तीन 

७०११३
कोल्हापूर : शोएब शेख हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन घोड्यांची नालबंदी करतात.

आवडीने जोपासला ‘नालबंदी’चा व्यवसाय
कला जीवंत ठेवण्यासाठी शोएब यांची धडपड; राजस्थानमध्ये घेतले शास्‍त्रशुद्ध शिक्षण
मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर, ता. १० : पूर्वी घोड्यांचा खरारा करणे किंवा घोड्याच्या नाल मारणे काम ठराविक लोकांकडूनच केले जायचे. कालांतराने या व्यवसायाला कमी लेखले जाऊ लागले. काही शौकीन किंवा घोडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोकच घोडे पाळतात. मोठ्या शहरात रेसकोर्सवर किंवा बहुधा हॉर्स शोसाठी घोडे पाळले जातात. ‘नालबंद’ या मुस्लिम समाजातील लोकांनी हा व्यवसाय सोडून त्यांनी अन्य उद्योग स्वीकारले. तथापि, कोल्हापुरातील एका युवकांने ‘नालबंदी’चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय चालू ठेवत कोणताही व्यवसाय कमी प्रतिष्ठेचा नसतो हे दाखवून दिले आहे. 
ऐषारामात राहण्यासारखा मोठा बेकरी व्यवसाय असूनही शोएब मुस्ताक शेख यांनी घोडेसवारीच्या शौकामुळे घोड्यांना नाल मारण्याचा व्यवसाय स्वीकारला. इतकेच नाही तर केवळ पारंपरिक स्वरूपाचा व्यवसाय न करता राजस्थानमधील एकमेव ‘नालबंदी स्कूल’मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आणि स्वित्झर्लंडचे मास्टर फॅरियर असलेले प्रशिक्षक बर्नार्ड दुवेर्णाय यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. दोन तीन आठवडे प्रशिक्षण घ्यायचे आणि तीन महिने सराव करायचा. अशा तीन सत्रात प्रशिक्षण करून त्यांनी चार वर्ष आपले प्रशिक्षण आणि व्यवसाय यशस्वीपणे चालू ठेवला आहे.
कोल्हापुरातील हिंदुस्थान बेकरीचे संचालक मुस्ताक मोहम्मद शेख यांचा मुलगा शोएब याने नालबंदी व्यवसाय स्वीकारला. घोडेस्वारी करता करता पुण्यातील जपलूप एक्वेस्टरियन सेंटरमध्ये घोडेसवारी केली. रोहन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घोड्यांविषयी माहिती घेत काम केले. खरे तर ‘मास मीडिया’ प्रशिक्षण घेतलेला हा युवक फिल्म एडिटिंगमध्ये मुंबईत काम करत होता. मुंबईमध्ये या कामात त्याचे मन रमले नाही किंवा घरातल्या बेकरी व्यवसायातही मन रमले नाही. त्यामुळे त्याने वडिलांच्या परवानगी नंतर हॉर्स शो करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय घोडेस्वारी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पण नंतर मात्र नालबंदी करण्याचा व्यवसाय स्वीकारण्याचे निश्‍चित केले. राजस्थानमधील फ्लायिंग अन्विल फाउंडेशन या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. येथे एकही भारतीय प्रशिक्षक नाही. मास्टर फॅरियर असलेले बर्नार्ड दुवेर्णाय यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले. त्याला चार वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या या प्रशिक्षणामुळे त्यांना मुंबई, पुण्यात रेसच्या घोड्यांच्या नाल मारण्यासाठी बोलावले जाते. इतकेच काय एनडीए मध्येही घोड्यांना नालबंदीचे काम त्यांच्या मार्फतच होत आहे.
---------------
चौकट
राजस्थानमध्ये देशातील एकमेव
नालबंदी केंद्र राजस्थानमध्ये देशातील एकमेव आहे. हे नालबंदी प्रशिक्षण केंद्र एनजीओ मार्फत चालवले जाते. येथे प्रवेशासाठी विशेष अटी नाहीत मात्र, घोड्यांबाबत प्राथमिक ज्ञान आणि खूर साफ करण्याची माहिती असल्याचा व्‍हिडिओ दिल्यानंतर प्रवेश मिळू शकतो.  
------------
अशी होते परीक्षा
प्रथम लेखी पेपर, लोखंडी पट्टी वाकवून ठोकून तयार घोड्याची नाल करणे, नालेला होल मारणे, एका घोड्याची खूर साफ करून पूर्ण नालबंदी निर्धारित वेळेत करणे, अशा प्रॅक्टिकलसह परीक्षा घेतली जाते.
---------------
कोट
सुरुवातीला या व्यवसायाला घरातूनच काय मित्रमंडळींनीही विरोध केला होता. इतक्या सुखवस्तू कुटुंबातील असूनही लग्नसाठी कोण मुलगी देत नव्हते. परंतु ही कला जिवंत ठेवल्याचा अभिमान आहे. आज या व्यवसायनेच प्रतिष्ठा आणि नावही मिळवून दिले आहे.
- शोएब मुस्ताक शेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com