बिनधास्त बोला...आवाज कोल्हापूरचा

बिनधास्त बोला...आवाज कोल्हापूरचा

फोटो - 70196
लोगो : आवाज कोल्हापूरचा

लोकसभेत हवे खमके नेतृत्व
निधीचा गाजावाजा करण्यापेक्षा कामांचा हिशेब मांडण्याची आवश्‍यकता

कोल्हापूर : जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. नैसर्गिक संपदेने समृद्ध परिसर आहे. तरीही पुणे, नाशिक, औरंगाबादपेक्षा जिल्ह्याची विकासातील गती संथ आहे. या शहरांचा कायापालट झाला असताना कोल्हापूर जिल्हा मात्र मागे राहिला. खमके नेतृत्त्व नसल्याचा तो परिणाम आहे. लोकांत मिसळणारा, जमिनीवर राहून काम करणारा लोकप्रतिनिधी अर्थात खासदार हवा आहे. केवळ निधी आणल्याचा गाजावाजा करण्यापेक्षा त्यातून कामे कितपत केली, याचा हिशेब मांडण्याची आवश्‍यकता आहे. पक्षाशी निष्ठा बाळगण्याऐवजी पक्ष बदलणारे नेतृत्त्व पोकळ आहे. रस्ते, पार्किंग, वाहतुकीची कोंडी ते बेरोजगारीचे असंख्य प्रश्‍न सोडविणारे नेतृत्त्व जोपर्यंत लाभत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात विकासाची गंगा गतिमान होणार नाही, असा सूर ‘आवाज कोल्हापूरचा’ उपक्रमात नागरिकांनी आज येथे व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहातर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात त्याचे आयोजन केले होते.


प्रा. टी. के. सरगर म्हणाले, ‘जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. त्याने निधी खेचून आणावा. शहरातील ज्वलंत प्रश्‍न ताकदीने सोडविणारा तोलामोलाचे नेतृत्त्व नसेल, तर विकास खुंटणार. आज पाणीप्रश्‍न ज्वलंत आहे. रस्त्यांची स्थिती बिकट आहे. गट-तट विसरून या प्रश्‍नांची तड लावावी.’
ज्येष्ठ फुटबॉलपटू लाला गायकवाड म्हणाले, ‘जिल्ह्यात पर्यटक येणे मुश्‍‍की‍ल झाले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नाही. क्रीडांगणांचा चेहरा बदलायला तयार नाही. भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न ''जैसे थे'' आहे. केवळ निधी आणल्याचा कांगावा करण्यापेक्षा कामांची पूर्तता किती झाली, याचा लेखाजोखा मांडणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. त्याने लोकांना भेटून त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावेत. मागण्यांचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत.’
ज्यूदो प्रशिक्षक शरद पोवार म्हणाले, ‘क्रीडा क्षेत्राचा निव्वळ खेळखंडोबा सुरू आहे. रेसकोर्स नाका येथील विभागीय क्रीडा संकुलाचे काम अद्याप पूर्णत्‍वास गेलेले नाही. संकुलातील जलतरण तलावात सांडपाणी मिसळत आहे. त्यावर इलाज झालेला नाही. एखादी क्रीडा स्पर्धा घ्यायची म्हटले तर खेळाडूंना राहण्यासाठी वसतिगृह नाही. लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न समजून घेऊन ते तत्काळ सोडवावेत.’
शस्त्र अभ्यासक विनोद साळोखे यांनी लोकप्रतिनिधींत वैयक्तिक ईर्षा टोकाची बनल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘कोल्हापूरला सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिकतेचा वारसा आहे. लोकप्रतिनिधी तो लक्षात न घेता केवळ कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. लोकाभिमुख विकास होताना दिसत नाही. पक्ष बदलायला ते तयार आहेत. पाच वर्षांत साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी खर्च झाला का?’’
महेश निकम म्हणाले, ‘दोन-अडीच वर्षांत राजकारण गढूळ झाले असून, मतदारांचा विश्‍वासघात केला जात आहे. जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्वविकासात ते मग्न झाले आहेत.’ प्रथमेश सूर्यवंशी म्हणाले, ‘मराठा आरक्षणाचा विषय रेंगाळला आहे. त्यामुळे जो उमेदवार मत मागायला येईल, त्याला त्याने या प्रश्‍नावर किती योगदान दिले, हे विचारावे.’ आरती वाळके यांनी रोजगाराच्या संधी नसल्याने मुले परदेशात नोकरीसाठी जात असून, लोकप्रतिनिधी पक्षाशी एकनिष्ठ नसतील, तर कार्यकर्त्यांनी कसे एकनिष्ठ राहायचे, असा प्रश्‍न उपस्थित केला. सरिता सासने म्हणाल्या, ‘लोकप्रतिनिधीने तळागाळात पोहोचायला हवे. सर्वसामान्यांची विचारपूस करत त्याने प्रश्‍न सोडवावेत. निधी परत जाण्याची वाट पाहू नये.’ मिलिंद सावंत म्हणाले, ‘शहरात शौचालयांची कमतरता असल्याने पर्यटकांनी येथे कसे यायचे? राजर्षी छत्रपती शाहू महाराज, रणरागिनी ताराराणी यांचे कोल्हापूर हेच का? असे प्रश्‍न पडतात. गांधी मैदानाचा प्रश्‍न अजूनही जैथे आहे.’ यावेळी शोभा तांबट, अक्षय जरग, ओंकार मोरे, हर्षद शिंदे, इंद्रजित साळोखे, सचिन डेंगे, संजय निकम उपस्थित होते.
-----------------
चौकट
शहराची हद्दवाढ कराच...
शहराच्या हद्दवाढीशिवाय विकासाची चक्रे वेगाने फिरणार नाहीत. पिकाऊ जमीन नापीक होऊ लागली आहे. त्याचा विचार कोण करणार? एखाद्या आमदार, खासदाराला भेटायचे जायचे म्हटले तर चार-पाच अडथळे पूर्ण करावे लागतात. त्यामुळे सक्षम व सर्वांना न्याय देणारा खासदार असणे गरजेचे आहे, असे प्रा. सरगर यांनी स्पष्ट केले.
------------------
ठळक चौकट
या आहेत अपेक्षा
- लोकप्रतिनिधी निष्ठावान असायला हवा
- आम्हाला मालक नको तर सेवक पाहिजे
- पंचगंगा प्रदूषण, हद्दवाढीचा प्रश्‍न सुटायला हवा
- आय. टी. क्षेत्राचा विकास त्वरित व्हावा
- विभागीय क्रीडा संकुलाचे अधर्वट बांधकाम पूर्ण करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com