तेवरे कुटूंबियांची स्वप्नेच आगीत बेचिराख

तेवरे कुटूंबियांची स्वप्नेच आगीत बेचिराख

70292, 70294
...
तेवरे कुटुंबीयांची स्वप्नेच आगीत बेचिराख
कुटुंबाचा जगण्याचा आधार हरपला : दहावीत शिकणाऱ्या तनिष्काची वह्या-पुस्तके जळाली
गौरव डोंगरेः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १०ः हातातील हेअरड्रायर शॉर्ट होऊन पेटल्याने अनुष्काने घाबरून तो झटकला. जळणारा ड्रायर फेकून ती बाजूच्या खोलीत गेली. कौलारू आणि मातीच्या घरातील लाकडी सामान, कपाटे, कपडे काही मिनिटांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बघता बघता ज्वाळा उसळू लागल्या. आई वंदना या अनुष्का आणि तनुष्का या मुलींना घेऊन कशाबशा घराबाहेर आल्या. प्रापंचिक साहित्य, वडिलांचे व्यावसायिक साहित्य जळून खाक झाले. तनिष्का सध्या दहावीची परीक्षा देत असून, तिची वह्या-पुस्तके या आगीने गिळंकृत केली. रात्र जागून काढलेल्या तेवरे कुटुंबीयांची जणू स्वप्नेच आगीत बेचिराख झालीत.
बागल चौकात राहणाऱ्या तेवरे कुटुंबीयांच्या मातीच्या घरात शनिवारी आगीने तांडव केले. सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अनुष्का हिच्या हातातील हेअरड्रायरने अचानक पेट घेतला. तो जागीच पडल्याने कपडे, लाकडी सामान बघता बघता आगीच्या लपेट्यात आले. आगीचे लोट पत्र्यातून बाहेर पडू लागले. आरडाओरडा करत तेवरे मायलेकींनी शेजाऱ्यांना बोलावले. अग्निशमन यंत्रणेच्या चार गाड्यांनी सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
तेवरे कुटुंबीयांचे असणारे घर चार खोल्यांचे असून, तीन खोल्यांमधील साहित्य बेचिराख झाले आहे. कसेबसे किचनमधील जेवणाचे साहित्य उरले, मात्र तेवरे बंधूंचे इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायातील सजावटीचे साहित्य, वस्तू असे दहा लाखांचे साहित्य जळाले.
...
नातेवाईक, शेजाऱ्यांच्या घराचा आसरा
तनिष्का सध्या इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. तिनेही खोलीतून पळ काढल्याने अभ्यासाचे सगळे साहित्य त्याच ठिकाणी पडून होते. आगीमध्ये तिच्या वह्या, पुस्तके, नोट्स जळून गेले. शनिवारच्या रात्री तेवरे कुटुंबाने नातेवाईक, शेजाऱ्यांच्या घराचा आसरा घेतला. भीतीच्या छायेत सर्वांनी रात्र जागून काढली. रविवारी सकाळी शैलेश तेवरे, महेश तेवरे, वंदना तेवरे घराजवळ आले होते. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याने पोलिसांनी त्यांचे घर सील केले होते. दुपारच्या सुमारास फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून येथील काही नमुने घेतले.
...
कुटुंब भीतीच्या छायेत
शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सोफा, बेड, प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. छताचा भाग जळला असून टीव्ही, फॅनसह सर्व साहित्य भस्मसात झाले. कष्टातून उभारलेला प्रपंच डोळ्यांसमोर जळताना पाहून तेवरे कुटुंबीयांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com