सीपीआर

सीपीआर

सीपीआर लोगो
...
स्वयंघोषित ‘मेहुण्या-पाहुण्यां’चा सुळसुळाट
सीपीआरमधील डॉक्टरांवर टाकला जातो दबाव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : पालकमंत्र्यांकडून आलोय किंवा बोलतोय, त्यांचा मेहुणा, पाहुणा आहे. सीपीआरमध्ये एवढ्या गैरसोयी आहेत, डॉक्टर जागेवर नसतात, अमूक विभागात तमूक साहित्याची कमतरता आहे. इथंपासून ते किती गलथान कारभार चाललाय तुमचा... आंदोलन करावे लागेल... आमची तेवढी ‘सोय’ करा, थोड्याफार फरकाने, अशा शब्दांत सीपीआर रुग्णालयाच्या वरिष्ठांना धारेवर धरणाऱ्यांचे प्रकार घडत आहेत. त्याला आता पालकमंत्र्यांनीच चाप लावण्याची गरज आहे.
गेल्या दोन महिन्यांत सीपीआर रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेवरून आरोप झाले, चौकशी झाली, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस झाली. या घटनांचा आधार घेत काही संस्थांचे पदाधिकारी थेट अधिष्‍ठाता, वैद्यकीय अधीक्षक किंवा विभाग प्रमुखांशी प्रत्‍यक्ष किंवा फोनवर संपर्क करतात. सीपीआरमधील काही उणिवांवर चर्चा करतात. स्वच्छता कामाचा ठेकेदार बदला, अमूक विभाग प्रमुखांची बदली करा किंवा अमूक डॉक्टर खासगी प्रॅक्‍टिस करतात. त्यांना घरी घालवा, काहीबाही मागण्या करतात. अन्यथा, आंदोलन करतो असे सांगत जाता जाता ‘आमच्या संघटनेचे-पक्षाचे सोलापूरला अधिवेशन आहे. आम्ही जाणार आहोत. काही तरी मदत करा,’ अशी सूचना करतात. अशी मदत करता येणार नाही म्हटले की, खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्टरांकडून ‘काही तरी लाभ’ घ्या, तोच आम्हाला द्या, असेही सुचवितात.
सर्जिकल सहित्य निविदा प्रकरणानंतर जवळपास दहा-बारा कार्यकर्त्यांनी सीपीआर आवारातील अतिक्रमण, सफाई ठेका, कॅन्टीन ठेका, औषध खरेदी, हृदयशस्त्रक्रिया, प्रसूती, बालरोग विभागातील विविध खरेदी व गैरसोयींचे उल्लेख करीत डॉक्टर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आर्वाच्च भाषेत सुनावल्याचे प्रसंग सीपीआर वर्तुळात रोज चर्चेत येत आहेत. याबाबत सीपीआरमधील तीन वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी असे प्रकार घडत असल्याचे मान्य केले.
...
डॉक्टरांची होतेय कोंडी
सीपीआरची एखादी गैरसोय उघड झाली की, थेट सीपीआरच्या वरिष्ठांना फोन येतो. मी पालकमंत्र्यांचा पाहुणा बोलत असल्याचे सांगण्यात येते. कोणत्यातरी साधनसुविधा निविदा प्रक्रियेची माहिती विचारली जाते. बोलणारा खरेच पालकमंत्र्यांचा नातेवाईक आहे की नाही हे समजून येत नाही. अशावेळी उत्तर काय द्यावे, याविषयी डॉक्टरांची कोंडी होते. रोज दोन-तीन फोन असे येतात की, पालकमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख सांगून पुढील कथन सुरू होते. त्यामुळे डॉक्टरांनी फोनवर उत्तरे द्यावीत, प्रशासकीय काम पाहावे की रुग्ण उपचारसेवा द्यावी, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com