आचारसंहीतेआधीच आघाडी-युतीच्या प्रचाराचा धडाका

आचारसंहीतेआधीच आघाडी-युतीच्या प्रचाराचा धडाका

सरकारनामा ... लोगो
...
आचारसंहितेआधीच प्रचाराचा धडाका
गाठीभेटींना जोर : आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात, राजकीय वातावरण तापू लागले
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः लोकसभेची आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाच्या चर्चाही अद्याप सुरूच आहेत. संभाव्य उमेदवारांची नावे जरी चर्चेत असली तरी अद्याप अधिकृत घोषणा नाही. असे असले तरी नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. गावागावांतील गाठीभेटी, विकासकामांची उद्‌घाटने, विविध सामाजिक कार्यक्रम आणि नेत्यांचे एकमेकांवरील आरोप - प्रत्यारोप यामुळे एका अर्थाने प्रचार सुरूच झाला आहे. त्यात सोशल मीडियावरील रिल्स आणि पोस्ट यातून आता घोडे मैदान लांब नाही, याची जाणीव होऊ लागली आहे.
लोकशाहीचा उत्सव असणारी लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागा वाटपाची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. अद्याप उमेदवारदेखील नक्की नाहीत. असे असले तरी संभाव्य उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. यामध्ये गाठी-भेटी घेण्यावर जोर आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आमदार सतेज पाटील यांनीही गावोगावच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबद्दल संभ्रम असला तरी त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यांनी गावागावांमधील आपला गट सक्रिय केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यांनी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा दौरा नुकताच सुरू केला असून, ते त्या मतदारसंघात जाऊन लोकसभेच्या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे आचारसंहिता सुरू होण्याआधीच प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.
...
विकासकामांच्या उद्‌घाटनांचे निमित्त
आचारसंहिता लागण्याआधी विविध विकासकामांची उद्‌घाटने पार पाडण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल आहे. रस्ते, ग्रामपंचायतींच्या इमारती, स्मारके यांच्या उद्‌घाटनातून लोकसभेचा प्रचार सुरू आहे. याची सुरुवात कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटतून झाली. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाच्या कार्यक्रमातही लोकसभेच्या प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली.
...
सोशल मीडियावर रणकंदन
सोशल मीडिया हा लोकसभेच्या प्रचारासाठी आजपर्यंत प्रभावी ठरला आहे. सध्या नेत्यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक अकौंटवरून मोठ्या प्रमाणात रिल्स आणि पोस्ट पाठवल्या जात आहेत. तसेच भावनिक आवाहन करणारे कॅम्पेनही राबवले जात आहेत. ‘राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वारस दिल्लीत पोहचवूया’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावरून सुरू होती. त्याला उत्तर म्‍हणून ‘मान गादीला मत मोदींना’ अशी पोस्ट व्हायरल झाली. एकूणच आता सोशल मीडियावरील रणकंदनाला सुरुवात झाली आहे.
...
राजकीय आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची नांदी राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी सुरू झाली आहे. ‘शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर त्यांना बिनविरोध खासदार करा,’ असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले होते. त्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘सतेज पाटील यांच्यात इतका बालीशपणा कधी आला?’ विमानतळ विस्तारीकरण आणि थेट पाईपलाईन यावरून खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातही आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे आता निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com