रेबीज मृत्यू चौकशी अहवाल
कुत्रे चावल्याची जखम स्वच्छ धुतली नाही
चौकशी समितीचा अहवालात ठपका ः रेबीजने युवती मृत्यू प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः ‘त्या’ युवतीला कुत्रे चावल्यानंतर उपचारावेळी जखम चांगल्या प्रकारे धुतली गेली नाही, हे देखील तिच्या मृत्यूच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा ठपका केंद्रीय चौकशी समितीने ठेवला आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचे हल्ले रोखण्यासाठी निर्बीजीकरण व लसीकरण आदी उपाय समितीने दिलेल्या अहवालात सुचवले आहेत. हा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर वैद्यकीय अधिष्ठाता अशा सर्व जबाबदार विभागांना देण्यात आला आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी भाऊसिंगजी रोडवर मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात १७ जण जखमी झाले. यात श्रृष्टी शिंदे या युवतीचा समावेश होता. यानंतर जखमी श्रृष्टीला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे तिला रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. पहिली दोन इंजेक्शन तिने सीपीआरमध्ये घेतली. त्यानंतरची दोन इंजेक्शन सीपीआरमध्ये घेतलेली नाहीत, ती खासगी दवाखान्यात घेतल्याचे सीपीआरने तेव्हा सांगितले होते. यानंतर श्रृष्टीचा काही दिवसांत मृत्यू झाला. त्याची राष्ट्रीय साथरोग नियंत्रण विभागाने गंभीर नोंद घेत डॉ. हुनल ठुकराल व डॉ. सोवंताप्पन बालसुब्रमनीयम या दोन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने कोल्हापुरात येऊन केलेल्या चौकशीचा अहवाल केंद्र शासनाला सादर केला. त्याची एक प्रत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला दिली आहे.
कुत्र्याने केलेला हल्ला श्रृष्टीच्या नसांपर्यंत खोलवर गेला. त्यातून जंतू संसर्ग शरीरभर जलदगतीने पसरला. यात सीपीआरमध्ये जखम स्वच्छ करण्यासाठी पाण्याच्या प्रवाही पाण्याने धुण्याची यंत्रणा असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे जखम स्वच्छ धुतली गेली नाही, असे चौकशी समितीने नमूद केले आहे. याशिवाय चौकशी समितीने कोल्हापुरात मोकाट कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचेही नमूद केले असून निर्बीजीकरण तसेच मोकाट कुत्र्यांना लसीकरण करणेही गरजेचे असल्याचे नमूद केले आहे.
कुत्रे चावल्यानंतर होणारी जखम चांगल्या प्रकारे किमान पंधरा मिनिटे स्वच्छ व प्रवाही पाण्यात धुतली जाणे आवश्यक आहे. त्यातून ८० टक्के जंतू संसर्ग टाळता येणे शक्य होते. त्यानंतर शरीरात जंतू राहिल्यास तो जंतू इंजेक्शनव्दारे संपृष्टात येईल, अशी शिफारस केंद्रीय चौकशी समितीने दिलेल्या अहवालात केली आहे. अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी दिली.
...
कोल्हापूर जिल्ह्यात २०१३ ते २०२४ या कालावधीत कुत्रे चावल्यामुळे ३१ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्यांची संख्याही चौकशी समितीने अहवालात नमूद केली आहे. ती अशी ः
वर्ष - जखमींची संख्या
२०१७ - ५२,३७८
२०१८ - ७५,४०५
२०१९ - ६६,३१५
२०२० - २३,०६८
२०२१ - १३,५७६
२०२२ - २४,३१७
२०२३ - ७५,३४७
२०२४ - १४,५३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

