रथोत्सवाची जय्यत तयारी

रथोत्सवाची जय्यत तयारी

Published on

लोकोत्सवाची जय्यत तयारी...!
उद्या-गुरुवारी सजणार रथोत्सवाचे सोहळे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव बुधवारी (ता.२४) तर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव गुरुवारी (ता. २५) पारंपरिक उत्साहात होणार आहे. कोल्हापूरकरांच्या या लोकोत्सवाची जय्यत तयारी आता सुरू झाली असून, नयनरम्य आतषबाजी, विविधरंगी रोषणाई, फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक रांगोळ्या हे यंदाच्या सोहळ्यांचेही वैशिष्ट्य राहणार आहे. दरम्यान, रथोत्सव मार्गावर सध्या विविध कामे सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

सागवानी रथातून
अंबाबाईचा रथोत्सव
चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या श्री अंबाबाईच्या रथोत्सवाच्या निमित्ताने संस्थानकालीन परंपरा अनुभवायला मिळते. श्री अंबाबाई आणि संस्थानकालीन वैभव सर्वसामान्य भाविकांना पाहण्यास खुले करण्याच्या उद्देशानेच हा रथोत्सव सुरू झाला. देवस्थान समितीने तयार केलेल्या नवीन सागवानी रथातून यंदाही रथोत्सवाचा सोहळा होईल. सोहळ्याची तयारी वेगाने सुरू असून, रथाची उद्या (ता. २३) चाचणी घेतली जाणार आहे. महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसादाचे वाटप, तर न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे संपूर्ण गुजरी आणि महाद्वार मार्ग विविधरंगी रोषणाईने उजळणार आहे.

श्री शिवछत्रपती,
ताराराणींचा रथोत्सव
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवछत्रपती व महाराणी ताराराणी यांच्या स्मृती चिंरतन जपण्याबरोबरच नव्या पिढीला त्यांच्या शौर्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सोहळा सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे राष्ट्रपुरुष असले तरी इंग्रजांच्या राजवटीत त्यांचे नाव घेऊन एखादा उत्सव साजरा करणे, ही खूपच क्रांतिकारी घटना होती. अशा वेळी राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर तिसऱ्या दिवशी येथे शिवाजी महाराज व ताराराणी रथोत्सवाची सुरुवात केली. गुरुवारी (ता. २५)पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री आठ वाजता हा सोहळा होणार असून, पारंपरिक वेशभूषेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. बाराईमाम मोहल्ला येथील बाबासाहेब मुल्ला परिवारातर्फे श्री अंबाबाई आणि शिवछत्रपती व ताराराणींच्या रथोत्सवावर पुष्पवृष्टीची परंपरा यंदाही जपली जाणार आहे.

आज साजरा होणार
हनुमान जयंतीचा उत्सव
जोतिबा यात्रेबरोबरच शहर आणि जिल्ह्यात उद्या (ता. २३) सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने कसबा बावड्यासह अनेक गावांच्या यात्रांही होणार आहे. दिवसभर हनुमान मंदिरात विविध धार्मिक विधी होणार असून, दर्शनासाठी मोठी गर्दी राहणार आहे. विविध ठिकाणी महाप्रसादांचे आयोजन केले असून, त्याचा लाभ जोतिबा यात्रेकरुंनाही घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com