काय त्यो  खोकी मोजाय गेलता व्हयं...

काय त्यो खोकी मोजाय गेलता व्हयं...

फड मतदारांचा
संतोष मिठारी

79801
कोल्हापूर : एनसीसी भवन-क्रांतिवन परिसरात मॉर्निंग वॉकर्सचा लोकसभा निवडणुकीबाबत चर्चेचा फड रंगला.
79802
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ताराबाई पार्क पितळी गणपती मंदिर परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये नागरिकांची चर्चा रंगली.

थेट बोलायचंबी मुश्कील झालंय राव...
मॉर्निंग-इव्हिनिंग वॉकर्सनी मांडल्या भावना; निवडून येणाऱ्यांनी किमान संसदेत हजेरी लावावी

कोल्हापुरात काहीही झाले तरी केंद्रातील मोदी सरकार अजून पाच वर्षे तरी हलणार नाही, हे नक्की. विरोधकांत तरी कुठं एकी हाय? सकाळी आणि संध्याकाळी शहरातील विविध ठिकाणी फिरायला येणाऱ्या मंडळींतील हा संवाद. आजवर अनेक पावसाळे पाहिलेले एक आबा तर सांगतात, ‘मताचा अधिकार मिळाल्यापासूनच्या लोकसभेच्या निवडणुका अजूनही आठवतात; पण यंदाची निवडणूक फारच वेगळी हाय. बघेल तिकडे नुसतं दबावाचंच राजकारण चाललंय. थेट बोलायचंबी मुश्कील झालंय राव’. हे थांबणार की आणखी वाढतच जाणार, अशी भीतीही ते व्यक्त करतात.
-------------
दिवस बुधवारचा..दिवसभर उन्हाचा तडाखा आणि आता मावळतीला आकाशात ढगांची गर्दी झालेली. जोरात वारे सुटले आणि वळीव बरसू लागला. ताराबाई पार्क पितळी गणपती मंदिर परिसरात इव्हिनिंग वॉकसाठी आलेली सारी मंडळी मग येथील नाना-नानी पार्कमधील शेडचा आधार घेतात. शेजारीच विविध वृत्तपत्रे ठेवलेली असतात. एकीकडे वळीव बरसत असतानाच मग एक निवृत्त पोलिस अधिकारी ‘कुणाचा जोर हाय’ असा प्रश्‍न विचारत निवडणुकीचा विषय काढतात. कोल्हापुरात दोघाही उमेदवारांना निवडणूक सोपी नाही. महाराज असोत किंवा प्रा. मंडलिक दोघांत कोण विजयी होणार, शेवटपर्यंत सांगणं फार मुश्कील असल्याचे एक काका सांगतात. विकासाचे मुद्दे बाजूलाच. नको त्याच विषयावर चर्चा सुरू आहे. एकमेकांना धमकावण्यापर्यंत साऱ्या गोष्टी निघाल्या आहेत. कसले असले हे राजकारण? दुसरीकडे तरुण पोरं रोजगार नाही म्हणून घरात बसून आहेत. त्यांना वाली आहे की नाही कोण, असाही सवाल ते उपस्थित करतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेतील फूट, मोफत धान्य देण्याचा निर्णय, देशातील निवडणुका आणि कोल्हापूरचं राजकारण, अशा विविध अंगांनी संवाद पुढे सरकत असतानाच पावसाचा जोर ओसरतो आणि ‘आता घरात लाईट हाय का गेली कुणास ठाऊक’ असा विचार करतच सारी मंडळी घराच्या दिशेने वळतात..
------------
‘खोकी’ काय मोजाय गेलता व्हयं
दिवस गुरुवारचा. राजेंद्रनगर ते सायबर चौक मार्गावरील एनसीसी भवनजवळील क्रांतिवनाच्या रस्त्यातून आत प्रवेश केला. गेल्या आठवड्यापासून उन्हाचा वाढलेला पारा बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वळवाच्या पावसाने कमी झालेला. त्यानंतरच्या प्रसन्न वातावरणात उजाडलेल्या दिवसाने येथील मॉर्निंग वॉकर्सचा उत्साह वाढलेला. चालण्याचा नेहमीच्या ट्रॅकवरून ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे पाय थांबले अन् काही वेळातच लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली. ‘महाराज असोत, की प्रा. मंडलिक कुणीही निवडून येऊ दे पण, त्यांनी आता संसदेत बसून कोल्हापूरचे प्रश्‍न सोडवावेत...’ असे एक जण म्हणताच वर्षभरापूर्वीच्या खोक्यांचा मुद्दा चर्चेत येतो. त्यावर तत्काळ दुसरा सहकारी ‘कुणीतरी तुम्हाला सांगणार ते ऐकून तुम्ही बोलणार राव आणि सांगणारा त्यो काय खोकी मोजाय गेलता व्हयं’, असे उत्तर देत हा मुद्दा खोडून टाकतो...
--------------
सगळा सत्तेचा बाजारच...
शेजारीच कट्ट्यावर आणखी काही मॉर्निंग वॉकर्स बसलेले. तेथून जाणाऱ्या एका तरुणाला कुणीतरी विचारते, ‘काय वातावरण कसे आहे. तो तरुण तत्काळ उत्तर देतो, ‘वातावरण चांगलंच तापलंय..पण, सगळा काय त्यो स्वतःच्या स्वार्थाचा आणि सत्तेचाच बाजार हाय राव...’ तेवढ्यात सेवानिवृत्त बँक कर्मचारी असणारे काका थेट प्रशासनावर घसरतात. प्रशासनानेही प्रामाणिक राह्यलं पाहिजे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. ज्येष्ठांच्या रंगलेल्या या चर्चेत मग स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक तरुण उडी घेतो आणि ‘भाजपने काय विरोधकांना संपवण्याचा विडाच घेतलाय. लोकशाही संपवायचीय का त्यांना?’ असा सवाल उपस्थित करतो. एव्हाना घड्याळाचा काटा आठच्या दिशेने निघालेला असतो. कोवळी किरणं आता हळूहळू तापायला लागलेली असतात.
----------------
ईडीची चौकशी थांबते कशी?
चर्चेला आता रंगत यायला लागलेली. तितक्यात ‘महावितरण’मधून निवृत्त झालेले एक काका ईडीच्या नोटिसीचा विषय काढतात. भाजपला साथ दिल्यानंतर ईडीची चौकशी कशी थांबते? असा मुद्दा पुढे येतो आणि ‘ती चौकशी तात्पुरती थांबलेली असते. पूर्ण बंद होत नाही कधी. देशात ईडीची चौकशी करणाऱ्यांमध्ये अवघे तीन टक्के राजकारणाशी संबंधित व्यक्ती असल्याचा सामूहिक सूर पुढे येतो. कॉँग्रेसने आता कोट्यवधी भारतीयांना लखपती बनवण्याची घोषणा केली आहे, तर सत्ताधारी फुकट रेशन देत आहेत. त्याऐवजी तरुणाईच्या हाताला काम द्यावं, अशी मागणी श्री छत्रपती शाहू मिल्समधून निवृत्त झालेले काका यावेळी करतात. ‘प्रशासनात आयएएस हवेत, मग देश चालवायला शिक्षणाचा निकष का नको?’ असा सवाल एका दुकानात अकौंटंट असलेला तरुण उपस्थित करतो. चर्चा पुढे सरकत असतानाच घड्याळात घराकडं जाण्याची वेळ झालेली असते आणि आपसूकच साऱ्यांची पावलं घराकडं वळतात...
---------------
चौकट
तेच ते प्रश्‍न, सुटणार तरी कधी?
रविवार सुट्टीचा दिवस. साहजिकच शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्रासमोरील हिरवळीवर सकाळी फिरायला आलेली मंडळी एरवीपेक्षा अधिक वेळ रेंगाळलेली. इथे फिरायला येणारी मंडळी तशी उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणारी. गेल्या चाळीस वर्षांपासून बघतोय की, कोल्हापूरचे प्रश्‍न जसे आहेत तसेच आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्याच विषयावर चर्चा होते. ते प्रश्न सुटायलाच हवेत आणि त्याच्या पुढे जाऊन आता विचार व्हायला हवा, असा येथील चर्चेचा सूर. मतदान करायचे इतकेच आपल्या हातात असले तरी निवडून येणाऱ्या खासदारांना पक्षांतर बंदी हवीच. पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा द्यायलाच हवा, अशा अपेक्षाही येथे व्यक्त झाल्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com