गड-बाहेरगावच्या मतदारांवर डोळा

गड-बाहेरगावच्या मतदारांवर डोळा

पुण्या-मुंबईसह बाहेरगावच्या मतदारांवर कार्यकर्त्यांचा ''डोळा''
स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ः ग्रामपंचायतीचे वातावरण लोकसभा निवडणुकीत

अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे सर्वच पर्यायांवर काम केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्या-मुंबईसह बाहेरगावच्या मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गावागावातील कार्यकर्ते त्यांच्यासाठी जोडण्या लावत असल्याचे चित्र दिसत आहे. स्वतंत्र यंत्रणा त्यावर कार्यरत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतील वातावरण लोकसभा निवडणुकीत अनुभवायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा टप्पा सुरू आहे. मतदानाची तारीख आठवडाभरावर आली आहे. निवडणूक पुढे सरकेल तसे चुरशीचे वातावरण तयार झाले आहे. विजयापर्यंत पोचण्यासाठी जे करावे लागेल ते केले जात आहे. नोकरी, व्यवसायानिमित्ताने पुणे, मुंबई येथे स्थायिक असणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. याशिवाय कोल्हापूर, इचलकरंजीतही अनेक मतदार आहेत. निवडणूक शेवटच्या टप्प्याकडे सरकत असताना आता या मतदारांवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत आहे.
बाहेरगावच्या मतदारांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. गावागावातील कार्यकर्त्यांकडून पुणे, मुंबईसह बाहेरगावी असणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून शोधली जात आहेत. त्यांच्या नातेवाईकांकडून मतदारांचे मोबाईल क्रमांक जमा केले जात आहेत. कार्यकर्त्यांकडून या मतदारांशी संपर्क साधला जात आहे. मुंबई व पुण्यातील मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्थायिक असणाऱ्या विश्वासू कार्यकर्त्यावर तेथील नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मतदारांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते. अधिकाधिक मते आपल्या पारड्यात पडण्यासाठी धडपड सुरू आहे.

चौकट
विधानसभा निवडणुकीला होणार फायदा
लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पुण्या-मुंबईसह बाहेरगावी असणाऱ्या मतदारांचा डाटा जमा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क होणार आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीलाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीत यंत्रणा अॅक्टीव्ह करण्यामागे हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

चौकट
उन्हाळी सुटीचा योग जुळलाय...
दरवर्षी शाळांचे निकाल १ ते ४ मेपर्यंत निकाल जाहीर होतात. त्यानंतर मुंबई, पुणेस्थित कुटुंब उन्हाळी सुटीसाठी आपापल्या गावाकडे परततात. या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले असतात. यंदा उन्हाळी सुटीला येण्याची वेळ आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख असा योग जुळला आहे. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चाने उन्हाळी सुटीला गावी येण्याची संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com