रुग्णांबरोबरच घेताहेत झाडांचीही काळजी!

रुग्णांबरोबरच घेताहेत झाडांचीही काळजी!

80567
रामपूर : रोपांना पाणी घालताना डॉ. विशाल किल्लेदार.
---------------------------

80568
रामपूर : रोपांच्या थेट मुळांना पाणी मिळावे यासाठी झाडाशेजारी प्लास्टीक बाटल्या बांधल्या आहेत.
---------------------------
रुग्णांबरोबरच घेताहेत झाडांचीही काळजी!

गडहिंग्लजचे निसर्गप्रेमी डॉक्टर : ३२ किलोमीटरवरून नेतात आठवड्यातून दोनदा पाणी

अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : गेल्या काही वर्षांत उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे झाडांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मात्र, झाडे लावावीत आणि लावलेली झाडे जगवावीत असे फारसे कुणाला वाटत नाही. मात्र, व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट असलेले येथील डॉ. विशाल किल्लेदार याला अपवाद ठरणारे आहेत. तब्बल ३२ किलोमीटरवरून आठवड्यातून दोनदा पाणी नेत आहेत. रामपूरच्या (ता. चिक्कोडी) पडिक माळावर लावलेली झाडे जगवण्यासाठी या निसर्गप्रेमी डॉक्टरची धडपड सुरू आहे. त्यांच्याकडून रुग्णांबरोबरच झाडांचीही काळजी घेतली जात आहे, असेच म्हणावे लागेल.
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एकीकडे वृक्षतोड थांबविली पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला झाडे लावली पाहिजेत. त्यासाठी शासन पातळीवरुन राबविली जाणारी मोहीमही ‘झाडे लावा झाडे जगवा’ या घोषणेपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येते. दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाच्या कामाला लोकांकडूनही फारसे बळ मिळताना आढळत नाही. या पार्श्वभूमीवर येथील डॉ. विशाल किल्लेदार यांचे काम उठावदार वाटते.
डॉ. किल्लेदार यांचे मूळ गाव चिक्कोडी तालुक्यातील रामपूर. तेथे त्यांची स्वत:ची जमीन आहे. यातील अडीच एकर पडिक जमिनीवर त्यांनी गतवर्षी १९५ रोपे लावली होती. पावसाळ्यात काही अडचण आली नाही. त्यानंतर तीन महिने विंधन विहिरीला पाणी होते. त्यापुढे पाण्याची अडचण निर्माण झाली. झाडे तर जगणे महत्त्वाचे. त्यामुळे गडहिंग्लजमधून दर बुधवारी व रविवारी डॉ. किल्लेदार आपल्या चारचाकी गाडीतून ८० लिटर पाणी घेऊन जातात. प्रत्येक झाडाला एक लिटर याप्रमाणे पाणी दिले जाते. त्यासाठी झाडाशेजारी प्लास्टिक बाटल्या बांधल्या आहेत, तर उर्वरित झाडांची तहान भागविण्यासाठी स्थानिक स्तरावर पाण्याची उपलब्धता केली जाते. गेले तीन महिने त्यांच्याकडून अव्याहतपणे ही धडपड सुरू आहे.

चौकट...
* देशी जातीची झाडे...
डॉ. विशाल किल्लेदार यांनी बहुतांश झाडे देशी जातीची लावलेली आहेत. यामध्ये हेळे, करंज, चिंच, लिंब, आंबा, सीताफळ, चिक्कू, सोनचाफा यांसह विविध जातीच्या झाडांचा समावेश आहे. दरम्यान, गतवर्षी देशी जातीची रोपे उपलब्ध होत नसल्याचा अनुभव आल्यामुळे डॉ. किल्लेदार यांनी घरीच रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कोट...
शाश्वत शेती काळाची गरज आहे. त्यासाठी पक्षी हवेत. घरटी असतील तर पक्षी येतील. झाडे असली तर घरटी बांधता येतील. त्यामुळे देशी जातीची झाडे लावली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी लावलेली झाडे जगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच धडपड सुरू आहे.
- डॉ. विशाल किल्लेदार, गडहिंग्लज
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com