मतदानचं कसं, हेनी सांगतिल तसं

मतदानचं कसं, हेनी सांगतिल तसं

फोटो ः 80666, 80667, 80668

लोगो
फिरस्ता बातमीदार
- सचिन भोसले
कोल्हापूर दक्षिण विधानसभा

मतदानाचं कसं, हेनी सांगतील तसं...
काही ठिकाणी ठरलंय, तर काही ठिकाणी अजून ‘निरोप’ यायचाय

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कळंबामार्गे निगवे खालसात गेलो. ग्रामपंचायतीजवळ सायकलवरून वैरणाचा भारा घेऊन एक वयस्कर निघाले होते. त्यांना विचारले ‘काका सरपंच कुठं असत्यात’ त्यावर ते म्हणाले, ‘त्या शाळंला गेल्यात’, आता भेटणार नाईत, ‘त्यांचं सासरं भेटतील बघा’ असे म्हणून ते पुढे निघाले. पुन्हा त्यांना थांबवत काय विशेष असे विचारले, त्यावर निवडणुका आमच्या नाईत, झेडपी, विधानसभेसारखा दम नाय, असे पटकन जाता जाता काकांनी उत्तर दिलं. तेथून पुढे जात तळ्यावर कापडं धुणाऱ्या महिलांशी संवाद साधला. त्यातील एका महिलेने तर ‘इलेक्शन बिलेक्शनचं आम्हाला टेन्शन नाय, मिस्टर सांगतील तसं आम्ही मतदान करणार’, असे एका दमात सांगून त्या पाचहीजणी लगबगीनं कापडं धुण्यात गुंग झाल्या.
-------

पुढे कावणेत प्रवेश केल्यानंतर एका कोपऱ्यावर दोघे तरुण दुचाकीवर, तर एकजण कोपऱ्याच्या कट्ट्यावर पाय ठेवून आणि एकजण खाली बसलेले दिसले. नमस्कार म्हटल्यावर त्यातील एकजण म्हणाला, कोण पाहिजे? ग्रामपंचायत कुठे आहे असे विचारल्यावर त्याने त्या चौकातून पुढ जा असे सांगितले. आभार मानून ‘काय विशेष म्हंटल्यावर सगळ्यांच्यात तोंडातून ‘काय नाय महाराजच, आमचं आमदार तर सातत्याने सगळ्यांचीच विचारपूस करत्यात. त्यामुळं त्यांचा संपर्क गावात हाय. पुढे चुयेत प्रवेश केल्यानंतर एका शेतात जनावरांचा चाऱ्यासाठी कडबा काढण्याचे काम सुरू होते. शेतातूनच महिलांशी संवाद साधला. तर त्यातील एका महिलेने हसत हसतच ‘काय नाय आमचं हेनी सांगतील तसं मतदान करणार’ असे सांगून टाकले.
वडकशिवालेत पंचायतीसमोर बसलेल्यांमध्ये बहुतांशी लष्करातून निवृत्त झालेली मंडळी होती. त्यांनी बघितल्यानंतर काय इलेक्शनसाठी आलाय का? असा थेट सवाल केला. ‘यंदाची निवडणूक जोराची हाय’ असे सांगितले. नंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुधगंगा-वेदगंगा नदी पुलावरून जरा खाली उतरत पोहणाऱ्यांशी संपर्क साधला. त्यातील पोहतच एकाने ‘नो पॉलिटिक्स, ओन्ली स्विमिंगउ असे सुनावले. दुपारनंतर नंदगाव असे दऱ्याचे वडगाव गाठले. तेथे ग्रामदैवताची यात्री नुकतीच झाली होती. त्यामुळे गावात आबालवृद्धांचा राबता होता. मात्र, कोणीही मतदान, उमेदवारांविषयी बोलायला तयार होईना. दुपारनंतर कोगील बुद्रुक, उजळाईवाडी, तामगाव, नेर्ली, हलसवडे, सांगवडेवाडी गाठली. तिथे उमेदवार काय आमच्यापर्यंत पोहचले नाहीत, असे अनेकांनी बोलून दाखविले. वसगडेत अनेक कुटुंबे शेतीत रमली होती. बुधवारी झालेल्या पावसामुळे भंबेरी उडाल्याचे सांगितले, तर महिला म्हणाल्या, ‘घरची पोरं म्हणंत्यात महाराजच. मग, ते म्हणत्यात तसं मतदान करणार,’ असे म्हणत त्या माऊली पुन्हा शेतात वाढलेले तण काढण्यात मग्न झाल्या. गडमुडशिंगीत तर एका महिलेने ‘रस्ता केल्याला नाय, मतदानबी करणार नाय,’ असे प्रचार करायला आलेल्या कार्यकर्त्यांना सुनावल्याचेही सांगितले.

कसं सुतासारंख सरळ केलंय बघा
उन्हाच्या तडाख्यामुळे शेतात आणि रस्त्यावर कामासाठी बाहेर पडलेली मंडळी अक्षरशः बेजार झाली होती. त्यात हलसवडेत ग्रामपंचायतीसमोरील कट्ट्यावर ज्येष्ठांमध्ये बसलेल्या तरुणाने तर अंगावर तोफ डागावी, तसा तोंडाचा पट्टा सुरू केला. मोदी साहेबांमुळे अन्नधान्याचा तुटवडा गेल्या काही वर्षांपासून जाणवला नाही. याशिवाय महिलांच्या खात्यात कसं पैसे जमा झाले, ३७० कलम कसे रद्द केले, काँग्रेसच्या काळात एखादा अतिरेकी देशाच्या सीमेवरून आत आला तर त्याला मारण्यासाठी दिल्लीतून परवानगी घ्यावी लागत होती. आता थेट कारवाई कशी होते आणि अतिरेकी कारवाया कशा रोखल्या, याचा लेखाजोखाच मांडला. त्याहीपुढे जाऊन एका ज्येष्ठ निवृत्त लष्करी जवानाने काय नाय पालकमंत्रीही चांगलं काम करत्यात. ते आमच्या मतदारसंघात नाईत. मात्र, त्यांनी कागलचा विकास कसा केलाया बघा, असा सल्लाही दिला. मोदी साहेबांचे काम म्हणजे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना कसं सुतासारख सरळ केलंय बघा. पुढे तर आणखी चर्चा रंगू लागली तसे महाराज आणि मंडलिक यांच्यात काटाजोड लढत कशी रंगणार याचेही वर्णन त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. त्यातील एका ज्येष्ठांनी तर वडकशिवाले-बाचणी रस्ता किती खराब झालाया, जरा जाऊन बघा, असा सल्लाही दिला.

हा रोजचा कार्यक्रम हाय आमचा...
कावणेत सकाळी साडेदहा-अकरालाच शांतता होती. जरा कानोसा घेतल्यानंतर कळालं. गावात काही तास वीज नसते. त्यामुळे बरचशी मंडळी शेतात जनावरांना चारा आणि कडबा धाटे काढण्यासाठी गेली आहेत. थेट शेतात जाऊन महिला मंजुरांशी संपर्क साधला. त्यात एका महिलेने आम्हाला राजकारणाचं काय कळत नाय. पहिलं काम आणि जनावरांना चारा पाहिजे. त्यामुळे आम्ही लगबगीने पहिलं शेत गाठतुया. हा ‘रोजचा कार्यक्रम हाय आमचा’ असे सुनावले. दऱ्याचे वडगावमध्य अनेकांनी कोणाला मतदान करायचे ते अजून निरोप आलेला नाय, त्यामुळे सांगू शकत नाय, असे थेट सांगितले.

चौकट
जेवणावळी नाहीत की भेटायला येत नाही
निगवे खालसात ग्रामपंचायतीजवळ पाण्यासाठी टाकलेल्या पाईपवर दोघे ज्येष्ठ बसले होते. त्यापैकी एकजण वारकरी होते. कलयुग हाय बाबा त्यामुळे निवडणुका तर केवळ फार्सच हाय. शेवटी पोटापाण्यासाठी आमच्या पोरांना एमआयडीसीत किंवा शहरात जावं लागतया. आता आम्ही रिटायर झालोया. मतदान कोणाला करायचं हे आमची पोरचं ठरविणार हायत. त्यातूनही एका ज्येष्ठांनी तर मंडलिकांच्या वडिलांना बघितल होतं. त्यांना काय बघितल्याल नाय. असेही त्यांना सांगितले. ग्रामपंचायतीसमोर बसलेल्या एका ज्येष्ठांने तर ‘या निवडणुकीत काय दम नाही’. जेवणावळी नाहीत की भेटायला कोण येत नाही, असे हसत हसत सांगितले.

चौकट
प्रमुख उमेदवारांचे फलक नाहीत, पण...
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मुडशिंगी, उचगाव, वसगडे, सांगवडे, हसवडे, नेर्ली, तामगांव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, कणेरी, कोगील खुर्द, कंदलगाव, गिरगाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव, निगवे खालसा, चुये, कावणे, कंळबा खेबवडे, वडकशिवाले, आदी गावांतील प्रमुख चौकात प्रमुख उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज किंवा संजय मंडलिक यांच्यासह २३ उमेदावारांपैकी एकाचेही छायाचित्र असलेला फलक दिसला नाही. मात्र, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांचे फलक या गावातील प्रत्येक प्रमुख चौकात उभारले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com