स्वादुपिंड व त्याचे आजार

स्वादुपिंड व त्याचे आजार

स्वादुपिंड व त्याचे आजार

स्वादुपिंड ही एक पचनसंस्थेतील महत्त्‍वाची ग्रंथी आहे. ती पोटामध्ये जठराच्या मागे आणि मणक्यांच्या वरील बाजूस वसलेली असते. पचनासाठी लागणारे सर्व महत्त्‍वाचे पाचकरस स्वादुपिंडात तयार होतात. तसेच शरीरातील साखर आणि स्निग्ध पदार्थांचा योग्य वापर आणि नियमन करण्यासाठी इन्शुलीन आणि तत्सम प्रकारची रसद्रव्ये जरुरीप्रमाणे स्वादुपिंडामार्फत रक्तामध्ये सोडली जातात. स्वादुपिंडात तयार होणारे पाचकरस ही जबरदस्त तीव्र प्रकारची रसायने आहेत. ती फक्त अन्नातच मिसळली गेली पाहिजेत. यासाठी हे पाचकरस स्वादुपिंडाच्या ग्रंथीत निष्क्रिय अवस्थेत तयार होऊन स्वादुपिंडाच्या नळीद्वारे आतड्यांत येतात. आतड्यांमधील इतर पाचकरसांशी संयोग झाल्यावर त्यांची पाचकशक्ती सक्रिय होते. पण, काही कारणांमुळे हे पाचकरस स्वादुपिंडातच सक्रिय झाल्यास या तीव्र रसायनांमुळे स्वादुपिंडाचा मोठ्या प्रमाणात दाह होऊ शकतो यालाच ‘पॅन्क्रियाटायटीस’ (स्वादुपिंडाचा दाह) असे म्हणतात.
अॅक्युट पॅन्क्रियाटायटीस (झपाट्याने वाढणारा तीव्र स्वरूपाचा स्वादुपिंडाचा दाह) याची प्रमुख कारणे : १) दारूचे अतिरिक्त सेवन, २) पित्ताशयातील खडे लिव्हरमध्ये पिवळे पित्त तयार होत असते (Bile). हे पिवळे पित्त ‘कॉमन बाईल डक्ट’ (CBD) या नलिकेद्वारे लहान आतड्यांत पचनासाठी येते. लिव्हरमध्ये २४ तास पिवळे पित्त तयार होत असते. आपल्या पोटामध्ये सतत २४ तास अन्नाचा पुरवठा होत नसतो. रात्री उशिरा पोट मोकळे झाले असतानाही लिव्हर पिवळे पित्त तयार करतच असते. मोकळ्या पोटी तयार झालेले पित्त साठवण्यासाठी CBD या नळीला एक पिशवी जोडलेली असते. याला पित्ताशय किंवा Gall Bladder असे म्हणतात. रात्री जसजसे यामध्ये पित्त साठत जाते तसतसे पित्तातील पाणी रक्तात शोषले जाऊन पित्त दाट बनते. अशा दाट झालेल्या पित्तामध्ये काही वेळेस काही लोकांच्या पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. या खड्यांमुळे पित्ताशयाचे तोंड बंद होऊन सूज आल्यास पोटात दुखू शकते. पित्ताशयातील खडा CBD मधे येऊन अडकल्यास रुग्णांस कावीळ होते.
पित्ताची नळी आणि स्वादुपिंडाची नळी एकमेकांना मिळून आतड्यांमध्ये एकाच तोंडाद्वारे उघडतात याला Ampulla of Vater ‘अॅम्पुला ऑफ वॅटर’ असे म्हणतात. जेव्हा पित्ताचा खडा Ampulla मधे अडकतो. त्यावेळेस पिवळे पित्त स्वादुपिंडामध्ये जाऊन स्वादुपिंडाचे रस सक्रिय होतात. यामुळे स्वादुपिंडातच सक्रिय झालेल्या पाचकरसामुळे स्वादुपिंडाचा तीव्र दाह होऊ शकतो. यामुळे स्वादुपिंडाचा काही भाग पूर्णपणे निकामी होऊ शकतो. तसेच हे सक्रिय झालेले पाचकरस रक्तात मिसळल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरातील इतर इंद्रियांवर होऊन रुग्ण खूपच गंभीररित्या आजारी पडू शकतो. यातून रुग्ण सावरल्यास काही दिवसांनी निकामी आणि मृत झालेल्या स्वादुपिंडाच्या भागामध्ये भयंकर अशा जंतूंचा शिरकाव होऊन तेथे ‘करट अथवा गळू’ निर्माण होऊ शकते. अशावेळी स्वादुपिंडास झालेल्या करटामधील पू आणि इतर घाण काढल्याशिवाय रुग्णाची प्रकृती सुधारू शकत नाही. नेहमीच्या शस्त्रक्रियेच्या मानाने एन्डोस्कोपीद्वारे केलेल्या उपचारांचा धोका बराच कमी असतो, असे जागतिक शोध निबंधाद्वारे सिद्ध झाले आहे. काही रुग्णांमध्ये सूज आलेल्या / दाह झालेल्या स्वादुपिंडामधून पाण्याचा पाझर होतो आणि अशा पाण्याची मोठी पिशवी तयार होऊन रुग्णांस पोटदुखी, कावीळ अथवा ताप येऊ शकतो. अशा रुग्णांवर एन्डोस्कोपीद्वारे यशस्वी उपचार केले जातात.
- डॉ. विवेकानंद कुलकर्णी, पोटविकारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com