दूध पिशव्या पुनर्वापर मोहीम कागदावरच

दूध पिशव्या पुनर्वापर मोहीम कागदावरच

दूध पिशव्या पुनर्वापर मोहीम कागदावरच
दुकानांमध्ये केवळ सूचनापत्रक ः इचलकरंजी महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३० : शहरात सर्व ठिकाणी प्लास्टिक कचरा विखुरलेला दिसून येतो. त्यामध्ये दुधाच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक असते. दुधाच्या पिशव्यांचा पुनर्वापार शक्य असल्याने महापालिका प्रशासनाने दूध विक्रेत्यांना विक्री होणाऱ्या दुधाच्या पिशव्या परत घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्या केवळ कागदावरच राहिलेल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून आलेल्या अधिसूचनेचे पालन करीत असल्याचे केवळ सोपस्कर महापालिका प्रशासन पार पाडत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार दुधाच्या पिशव्यांमुळे शहरामध्ये प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार सर्व दुधाच्या पिशव्या परिसरामध्ये न टाकता त्यांचा पुनर्वापर हाोण्यासाठी विक्री होणाऱ्या दुधाच्या पिशव्या रिकाम्या झाल्यानंतर ग्राहकांकडून परत घ्याव्यात. तसेच त्याबाबतच्या नोंदी ठेवून त्यांची एकत्रित साप्ताहिक माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात द्यावी. अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून शहरातील आस्थापनांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. तसेच याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कार्यवाहीचा इशारा दिला आहे. मात्र, ते कागदावरच राहिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
इचलकरंजी शहरात दररोज सुमारे तीन ते साडेतीन टन प्लास्टिक कचरा तयार होतो. शहरात फळ भाजी विक्रेते, दुकाने, खाऊ गल्ली, बिर्याणी गाडे, चिकन ६५ चे गाडे आदी ठिकाणी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. हे प्लास्टिक वन टाइम युज असल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी राबवलेल्या एका स्वच्छता मोहिमेमधून केवळ काळ्या ओढयामधून सुमारे ५०० ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा काढला होता. यामध्ये वन टाइम युज प्लास्टिकसोबत दुधाच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक होते.
-----------------------------------------
शपथीचा विसर
इचलकरंजी शहर होल्डिंगमुक्त केले. तसेच प्लास्टिकमुक्त करण्यास मदत करावी, असे आवाहन वर्षभरापूर्वी इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावेळी त्यांनी स्वत: व उपस्थित नागरिकांना वन टाइम युज प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ घेण्यास लावली होती, मात्र आज या शपथीचा विसर महापालिका प्रशासनास पडलेला दिसतो.
----------------------------
यावर बंदी
* प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या)
*प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवलेले व एकदाच वापरली जाणारे ताट, ग्लास, वाट्या, चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ
*हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी अॅल्युमिनियम कोटेड प्लेट, वाट्या, स्ट्रॉ, पॉलिप्रॉलीन बॅग
*द्रव पदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, ग्लास
* प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई
----------------------------------
आस्थापनांकडून विक्री झालेल्या दुधाच्या पिशव्या रिकाम्या झाल्यानंतर ग्राहकांकडून किती परत घेण्यात आल्या आहेत. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जमा झालेल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
-सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com