रमेश चेन्निथला पत्रकार परिषद-

रमेश चेन्निथला पत्रकार परिषद-

मोदी-शहांना महाराष्ट्र्र्र उद्धवस्त करायचाय
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला; जनता भुलणार नाही

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना महाराष्ट्रातील राजकारण व संस्कृती उद्धवस्त करायची आहे. संविधान तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आखून दिलेले आरक्षणाचे धोरण बदलायचे आहे. त्यासाठी ४०० पारचा नारा दिला जात आहे. पण महाराष्ट्राची जनता भुलणार नाही, ’’ असे प्रतिपादन कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्रात पराभव दिसू लागल्यानेच मोदी भयभीत झाले असून सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधानपदाला न शोभणारे शब्द वापरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
चेन्निथला म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असे संबोधणे म्हणजे महाराष्ट्रावर हल्ला केल्यासारखे आहे. पक्षांबरोबरच कुटुंबांनाही फोडायचे काम सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या मदतीचे, उद्योजक-व्यापाऱ्यांसाठी जीएसटीचे, अग्निवीरमधून युवकांचे प्रश्‍न भेडसावत आहेत. यामुळे विरोधी वातावरण झाल्याने त्यांनी रणनीती बदलली आहे. हिंदू-मुस्लिम विभागणी करून धर्मांधता पसरवण्याचे काम केले जात आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनामा मुसोलिनीचा जाहीरनामा म्हणून हिणवले जात आहे.’’ चेन्निथला म्हणाले, ‘‘सांगण्यासारखे दहा वर्षांतील ठोस काम नाही. त्यामुळे ते विविध प्रश्‍नांवर न बोलता दिशाभूल करत आहेत. कॉंग्रेस पाच वर्षांत पाच पंतप्रधान बनवणारे असे धादांत खोटे सांगत आहेत. कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णासारख्या उमेदवारासाठी त्यांनी मत मागितले आहे. त्याच्यावर काही बोलत नाहीत.’’ सांगलीतून बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू आहे. हायकमांडशी बोलून पुढील कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर उपस्थित होते.

चौकट
हिम्मत असेल तर...
मोदींनी शरद पवारांसाठी अशोभनीय शब्द वापरल्याबद्दल अजित पवार यांनी मोदींना त्याबाबत विचारेन असे सांगितले आहे. त्याबाबत विचारल्यानंतर चेन्निथला म्हणाले, ‘‘सभेवेळी शब्द वापरले त्यावेळी ते होते. त्यावेळी का विचारले नाही? त्यांची हिम्मत असेल तर मोदी यांना जरूर विचारावेच.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com