‘जीबी सिंड्रोम’ग्रस्त युवकाला जीवदान

‘जीबी सिंड्रोम’ग्रस्त युवकाला जीवदान

‘जीबी सिंड्रोम’ग्रस्त युवकाला जीवदान

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सीपआरमध्ये मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः ‘जीबी सिंड्रोम’ आजाराने गंभीर अवस्‍थेत सुळकूड (ता. कागल) येथील ध्रुव भोसले नावाचा १५ वर्षीय युवक सीपीआर रुग्णालयात दाखल होता. सुमारे चार लाखांच्या औषधोपचारातून तो पूर्ण बरा झाला आहे. त्याच्यावर सीपीआरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार झाल्याने त्याला जीवदानही मिळाल्याची माहिती सीपीआरचे मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. बुद्धिराज पाटील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
जीबी सिंड्रोम हा मज्जारज्जूंचा आजार आहे. यात हात-पाय थंड पडणे, त्यानंतर अवयवांतील ताकद निघून जाणे काही काळाने शरीराचा एकेक अवयव लुळा पडणे अशी लक्षणे दिसतात. ध्रुवच्या पाय व कंबरेतील ताकद गेल्याने लुळा पडलेल्या अवस्थेत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. येथे तातडीने त्याच्या तपासण्या केल्या. त्यात त्याला जीबी सिंड्रोम झाल्याचे निदान झाले. ध्रुवच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या पालकांनी सीपीआरमध्ये उपचार घेणे ठरवले.
यानंतर ध्रुवला सीपीआरच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. त्याला व्हेंटीलेटर लावले. याचवेळी रोज चार इंजेक्शन द्यावी लागत होती. एका इंजेक्शनची किंमत १८ हजार रुपये होती. त्यानुसार २१ इंजेक्‍शन दिल्यानंतर तो बरा झाला. त्यासाठी सलग पंधरा दिवस सीपीआरमध्ये त्याला राहावे लागले. इंजेक्शनचा खर्च तीन लाख ७८ हजार, तर औषधांचा खर्च २२ हजार असे एकूण सुमारे चार लाख रुपये खर्च झाला. मात्र, योजनेतून मोफत उपचार झाल्याने ध्रुव आता पूर्ण बरा झाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. ऐश्वर्या खंदारे, डॉ. सागर गायधन, डॉ. रेणुका माते, डॉ. आदित्य लांडे, डॉ. सौरभ डोंगरे, डॉ. सचिन गोधरा यांनी ध्रुवर उपचार केले.
....
कोट...
जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दर पंधरा दिवसाला एक ते दोन रुग्ण येतात. कोणत्याही वयातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. पोटातील संसर्गातून या आजाराची लक्षणे सुरू होतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे, शुद्ध पाणी पिणे अशी खबरदारी घ्यावी लागते, तसेच या उपचारासाठी लागणारी औषधे सीपीआरकडून उपलब्ध केली जात आहेत. त्यामुळे रुग्णांनी अशी लक्षणे दिसतात तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे.
डॉ. सत्यवान मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com