कोल्हापूरकरांनी साधला खरेदीचा ‘अक्षय’ मुर्हूत

कोल्हापूरकरांनी साधला खरेदीचा ‘अक्षय’ मुर्हूत

फोटो-82852
......
कोल्हापूरकरांनी साधला ‘अक्षय’ मुर्हूत
सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी; ग्राहकांसह बाजारपेठेत उत्साह

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्‍या मुहूर्तावर आज कोल्हापूरकरांनी विविध स्वरूपातील खरेदी केली. सोने-चांदीचे दागिने, गृहोपयोगी वस्तू, स्मार्ट फोन, वाहन, घर, आदींचा त्यात समावेश होता. त्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले.
दिवाळी पाडवा, गुढीपाडव्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यात अक्षय तृतीयेला गुंजभर तरी सोने खरेदी अनेकजण हमखास करतात. त्यानुसार चोख सोन्याबरोबरच वळे, कानचेन, टॉप्स, गळ्यातील चेनसह हिऱ्यांच्या दागिने खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. कोल्हापुरी साज, टेमप्ल ज्वेलरीलाही मागणी राहिली. वॉशिंग मशीन, फ्रीज, घरगुती आटाचक्की अशा गृहोपयोगी, तर स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, वॉच खरेदीवर काहीजणांनी भर दिला. बारावीची परीक्षा दिलेल्या आणि पुढे कॉम्प्युटर सायन्स आणि त्या अनुषंगिक अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी केली. पालकांकडून मुलांसाठी सायकलची खरेदी करण्यात आली. दुचाकी, चारचाकीसह ई-व्हेईकल्स काहींनी मुहूर्तावर घरी नेल्या. पूजेचे साहित्य आणि आंब्यांच्या खरेदीसाठी लक्ष्मीपुरी, शाहुपूरी, कपिलतीर्थ मार्केट, आदी परिसरात गर्दी झाली. शहरात काहीशा ढगाळ वातावरणासह उन्हाचा तडाखाही जोरात होता. त्यामुळे अनेकांनी दुपारी दीडपर्यंत खरेदी आटोपून घेतली. साडेतीनच्या सुमारास बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा पसरला. त्यानंतर सायंकाळी पाचनंतर पुन्हा बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली. गुजरीसह सराफ व्यावसायिकांच्या शोरूममध्ये ती अधिक दिसून आली. लग्न समारंभ नियोजित केलेल्या ग्राहकांची सराफ व्यावसायिकांबरोबरच भांडी, कापड दुकानांमध्येही लगबग दिसून आली.

चौकट
दर वाढला, तरीही सोने खरेदी
गुढी पाडव्यानंतर अडीच ते तीन हजार रुपयांनी उतरलेला सोन्याचा दर गुरुवारपर्यंत कायम राहिला. जीएसटीसह ७३ हजार ७०० रुपये दर होता. मात्र, त्यामध्ये आज दीड हजार रुपयांनी वाढ झाली, तरीही ग्राहकांनी सोने खरेदी केले असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.

चौकट
बांधकाम क्षेत्रातही उलाढाल
वन आणि टूबीएचके फ्लॅट, रो-बंगलो, हाऊसेसची नोंदणी करत ग्राहकांनी गृहस्वप्न साकारण्याचे पाऊल टाकले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बांधकाम क्षेत्रात बऱ्यापैकी चांगली उलाढाल झाल्याचे क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी सांगितले. प्लॉट खरेदीसह नव्या घराच्या बांधकामाची सुरुवात काही नागरिकांनी केली.

चौकट
सवलतींनी आनंद वाढविला
सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर घडणावळ, मजुरीमध्ये २० ते २५ टक्क्यांची सूट, गृहपयोगी आणि इलेक्‍ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदी आकर्षक भेटवस्तू, शून्य टक्के व्याजदरात अर्थसाहाय्य, आदी स्वरूपातील विविध सवलतींनी ग्राहकांचा खरेदीचा आनंद वाढविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com