यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश

यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश

यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश
अकरावी विज्ञान शाखा : शहरातील आठ महाविद्यालयांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी यंदाही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. शहरातील आठ कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही प्रक्रिया चालणार आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल.
अकरावी विज्ञान शाखेसाठी पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेश क्षमता कमी आणि इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असे विषम प्रमाण दरवर्षी होत होते. त्यामुळे प्रवेश देताना अनेक गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र असायचे. यावर पर्याय म्हणून सहा वर्षांपूर्वी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. त्यानंतर दरवर्षी ही प्रक्रिया राबवली जात आहे.
दरम्यान, अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांच्या अध्यक्षतेखाली कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत यंदाही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर अवाजवी आर्थिक भार पडू नये यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतरची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. दहावीचा निकाल यंदा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
----------------
...अन्यथा प्रवेश रद्दबातल
अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत होणारे प्रवेश शासनमान्य असतील. अन्य कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित करू नये. अन्यथा हे प्रवेश शासनाच्या नियमानुसार रद्दबातल ठरवण्यात येतील, असा इशारा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे सचिव तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
-------------------
दृष्टिक्षेपात प्रवेश प्रक्रिया
- कनिष्ठ महाविद्यालय संख्या..................... ८
- अनुदानित तुकड्या..................................... ६
- विनाअनुदानित तुकड्या.............................. ११
- अनुदानित तुकड्यातील प्रवेश क्षमता........... ५२०
- विनाअनुदानित तुकड्यातील प्रवेश क्षमता.... ९८०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com