नरेंद्र दोभोलकर खून खटला निकाल -प्रतिक्रीया

नरेंद्र दोभोलकर खून खटला निकाल -प्रतिक्रीया

निकाल लागला, पण न्याय मिळाला नाही

प्रतिक्रियांतून नाराजी व्यक्त; विचारांची, न्यायालयीन लढाई सुरूच ठेवू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अकरा वर्षांनी आज निकाल जाहीर झाला. यामध्ये दोघांना जन्मठेप झाली, तर इतरांची मुक्तता झाली. याबाबत कोल्हापुरातील पुरोगामी नागरिकांनी निकालावर नाराजी व्यक्त केली. कट रचल्याचा आरोप असलेल्यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे, हा न्याय म्हणता येणार नाही. विचारांची आणि पुढील न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली जाईल, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या.

फाशीची शिक्षा हवी होती
सरोज पाटील-राज्याध्यक्ष (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात कट रचणाऱ्यांची निर्दोष मुक्तता झाली; तर दोघांना जन्मठेप झाली. हा न्याय म्हणता येणार नाही. न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार कधीही संपणार नाहीत. त्यांचा विचार पुढे कायम ठेवला जाईल. या विचारातून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

माणूस मारता येतो, विचार नाही
सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सचिव (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
सुमारे अकरा वर्षांनी याबाबत सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना शिक्षा झाली; परंतु कटात सहभागी असणाऱ्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पुरोगामी चळवळीतील दाभोलकरांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवरील अन्यायच आहे. त्याबाबत वरील न्यायालयात निश्चितच दाद मागितली जाईल. माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही, हे सिद्ध करून दाखविले जाईल.
-------------------
आमचे काम, विचार थांबणार नाही.
सीमा पाटील, राज्य महिला विभाग सदस्य, अंनिस
अकरा वर्षांनंतर निर्णय दिला, याचे स्वागत आहे. पण हा न्याय म्हणता येणार नाही. यासाठी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहोत. आम्ही आद्यापही विवेक सोडलेला नाही. जन्मठेप दिलेले हे प्यादे आहेत. त्यांचे कटकारस्थान करणाऱ्यांना शिक्षा होणे अपेक्षित होते. प्रतिगामी सरकार उलटले तर न्याय मिळेल, असा विश्‍वास आहे. आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार कृतीतून सुरूच ठेवणार आहोत. निकाल काहीही आला तरीही आमचे काम, डॉ. दाभोलकरांचा विचार थांबणार नाही.
-----------------------

उणिवा तपासणे गरजेचे आहे
- दिलीप पवार, ज्येष्ठ नेते, फेरीवाले संघटना
किमान निकाल लागला याचे स्वागत आहे, पण ज्यांनी कट रचला त्यांना निर्दोष सोडले. यामुळे हा न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. या घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट रचणाऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत खरा न्याय मिळाला, असे होणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेत, तपासात, सादरीकरणात काही उणिवा राहिल्या का हे पाहणे गरजेचे आहे. ही न्यायालयीन आणि विचारांची लढाई सुरूच राहील.
-----------
खरा न्याय मिळाला नाही
- गीता हासूरकर, प्रधान सचिव, अंनिस
तब्बल अकरा वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्येही कट रचणाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. असे होऊ लागले, तर वैचारिक लढाईला काहीच अर्थ राहणार नाही. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद झाली तरच त्यातून खरा न्याय मिळतो, असे वाटते. सध्या दोघांना जन्मठेप झाली आहे, तर इतर मास्टरमाईंड असलेल्यांची मुक्तता केली आहे. यामुळे खरा न्याय मिळाला, असे वाटत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com