चंदगडच्या महिलेचा रेबिजने मृत्यू

चंदगडच्या महिलेचा रेबिजने मृत्यू

82881

कुत्रा चावलेल्या चंदगडच्या महिलेचा मृत्यू

उपचार घेऊनही वीस दिवसांनी निधन; कुटुंबीय हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, चंदगड ता. १० ः बेळेभाट (ता. चंदगड) येथे पिसाळलेला कुत्रा चावलेल्या रेणुका शंकर बागडी (वय ३८) यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर उपचार घेऊनही २० व्या दिवशी त्यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. गुरुवारी रात्री सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
रेणुका बागडी १९ एप्रिल रोजी अंगणात बसल्या असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला होता. चंदगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना इंजेक्शनही देण्यात आले होते. पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले होते. येथे उपचारानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात जाण्याचा सल्ला स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता.

कोल्हापुरातून तातडीने डिस्चार्ज
२० एप्रिल रोजी रेणुका बागडी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात आल्या. त्यांची जखम पाहून येथील डॉक्टरांना प्राथमिक चौकशी करून घरी जाण्यास सांगितले. मात्र, यावेळी नातेवाईक रेणुका यांना ॲडमिट करण्याची विनंती करत होते. त्यावर इंजेक्शन घेतल्याने गावी जाण्यास सांगण्यात आल्याचे घरच्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी पुढील चार डोस घेतले. या दरम्यान त्या नियमित घरकाम आणि शेतीची कामे करीत होत्या. रेणुका यांना काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने गडहिंग्लजमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचारात हलगर्जीपणाचा आरोप
रेणुका यांना ८ मे रोजी ताप आल्याने चंदगड प्राथमिक रुग्णालयात आणण्यात आले; तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ९) सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रेबिज झाल्याचा संशय असून, वैद्यकीय अहवालानंतर कारण स्पष्ट होणार आहे. पहिले पाच डोस घेऊनही मृत्यू ओढवल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. रेणुका यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक अशोक बागडी यांनी केला. रेणुका यांचा २००१ मध्ये शंकर बागडी यांच्याशी विवाह झाला होता. २०१५ मध्ये त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले होते. दोन दीर, जावा यांच्यासह त्या एकत्र कुटुंबात रहात होत्या. मनमिळावू आणि कष्टाळू बागडी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com