शहर पर्यटकांनी गजबजले

शहर पर्यटकांनी गजबजले

हॉटेल, यात्री निवास हाउसफुल्ल
आर्थिक उलाढाल वाढली ः दिवसभरात ७६ हजार भाविक अंबाबाई चरणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : शाळा कॉलेजना असलेल्या उन्हाळी सुट्या आणि रविवारची साप्ताहिक सुटी यामुळे कोल्हापुरात पर्यटकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव येथून आलेल्या भाविक, पर्यटकांमुळे कोल्हापूर गजबजले. पर्यटकांनी अंबाबाईच्या दर्शनासह जोतिबा, पन्हाळासह जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.
पर्यटकांमुळे शहरातील सर्वच व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल झाली. आज दिवसभरात ७६ हजार भाविक अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. मे महिन्यातील ही पर्यटकांची आजपर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे कोल्हापुरातील बहुंताशी सर्वच हॉटेल्स - लॉजेस हाउसफुल्ल झाली होती.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्य आणि राज्याबाहेरील पर्यटक गर्दी करतात. सुट्यांमुळे पर्यटक कुटुंबासहित अंबाबाईच्या दर्शनाला हजर होते. अंबाबाई मंदिरात पहाटेपासून सुरू असलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. दिवसभरात वाढलेल्या गर्दीमुळे देवस्थान व्यवस्थापन समिती व पोलिसांवर ताण राहिला. अंबाबाईच्या दर्शनानंतर पर्यटकानी रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. रंकाळा तलावावर पर्यटकांसह बालचमूंनी खेळाचा आनंद लुटला. त्यानंतर टाउन हॉल वस्तुसंग्रहालय, क्रांती उद्यान, न्यू पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांचे वस्तुसंग्रहालय पाहण्यास पर्यटकांनी पसंती दिली. जोतिबा डोंगरावर भाविकांनी दर्शन घेत पन्हाळगडावर पर्यटनाचा आनंद लुटला. परतीच्या मार्गावर असताना काहींनी नृसिंहवाडीला दत्त दर्शन घेतले. जोतिबाचे दर्शन गुलालात न्हालेले भाविक अंबाबाई परिसरात ठळकपणे दिसत होते.

आर्थिक उलाढाल वाढली
पर्यटकांची संख्या वाढल्याने शहरात आर्थिक उलाढाल वाढली. केएमटी, ऑटो रिक्षाच्या व्यवसायाला फायदा झाला. देवदर्शनानंतर कोल्हापुरी दागिने, गूळ आणि आंबे तसेच कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे महाद्वार रोड, पापाची तिकटी, चप्पल लाईन आणि गुजरी परिसर पर्यटकांनी फुलला होता. हौशी महिलांनी ठुशी, टिक्का, साज असे कोल्हापुरी पारंपरिक दागिने खरेदी केले. खास कोल्हापुरी पदार्थांची चव चाखण्यासाठी परराज्यांतील पर्यटकांनी प्राधान्य दिले. काहींनी कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा व मटणावर ताव मारला.

कोट
गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी कोल्हापुरात झाली नव्हती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. आज बऱ्याच पर्यटकांनी कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्यास पसंती दिली.
- प्रथमेश पाटील, कोल्हापुरी चप्पल विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com