हवा करवीरची … रविवार १२ मे, प्रसिध्द १३ मे

हवा करवीरची … रविवार १२ मे, प्रसिध्द १३ मे

हवा करवीरची
-----
आपले कामच बरे भावा...
निवडणुकीदरम्यान जसे काही कर्मचारी मतदानासाठी नेमले, तसेच काही विपरीत घडू नये म्हणून ठिकठिकाणी नाके, पथके नेमली होती. त्यांचे काम मतदानापूर्वीपासूनच सुरू असल्याने त्यांना नेहमीच्या कामातून सुटका मिळाली होती; पण काही पथकांना रात्रभर थांबावे लागत होते. रात्रपाळी करून वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी मतदानानंतर सुटका होईल असे वाटले; पण निवडणूक आयोगाने मतमोजणीपर्यंत पथके, नाके सुरू राहणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचा हिरमोड झाला. अजून रात्रपाळी करावी लागणार असल्याने त्यांच्या-त्यांच्यात आपले मूळ कामच बरे भावा... म्हणत एकमेकाला आधार देण्याशिवाय काही करू शकले नाहीत.
--------
साहेब, मशीनवर चिन्हच नाय!
लोकसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच झाले. शहरातील एका मतदान केंद्रावर एक ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय पक्षाच्या फुलाचे चिन्ह मतदान यंत्रावर शोधत होते. ते चिन्ह दिसत नाही म्हटल्यावर त्यांनी केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली. मला त्यालाच मतदान करायचे आहे. पण, ते चिन्हच दिसत नाही. मतदानयंत्रावर असणाऱ्या चिन्हापैकीच एकाला मतदान करावे लागेल, असे केंद्र प्रमुखांनी त्यांना सांगितले; पण ते ज्येष्ठ नागरिक काही ऐकायला तयार नव्हते. अखेर त्या ज्येष्ठांचे वय लक्षात घेऊन केंद्र प्रमुखांनी त्यांना जिल्ह्यातील राजकीय स्थिती, आघाड्या-युतीची माहिती सांगितली. त्यानंतर ते राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह मशीनवर नसून त्याच्या मित्रपक्षाचे चिन्ह असल्याचे दिसले. त्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाचा जीव भांड्यात पडला अन् ते मतदान करून बाहेर पडले.
-----------------------
आता या वयात प्रमाणपत्र कशाला?
लोकसभा निवडणुकीचे मतदान करणाऱ्या ८५ वर्षांच्यावरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाची सुविधा दिली. काहींनी थेट मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. या ज्येष्ठांना प्रशासनाने प्रमाणपत्र दिले. या वयातही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेतला. उपनगरातील एका केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले. केंद्र प्रमुखांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी ते ज्येष्ठ नागरिक म्हणाले, ‘आता निवृत्त होऊन २५ वर्षे झाली. या वयात हे प्रमाणपत्र घेऊन काय करू?’ त्यांच्या या विधानेने तेथे चांगलाच हशा पिकला.
------------------------------
‘खाकी’कडून खरडपट्टी...
कसबा बावड्यात बाजारपेठेतील शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी असतानाही तेथे खाकीवाल्यांचा ताफा दाखल झाला. साहेब प्रवेशद्वारातून आत शिरताच एका कर्मचाऱ्याने खिशातला मोबाईल काढून त्यांचे भरभर फोटो टिपले. ‘सरदार बहुत खूश होगा. शाबासी देगा,’ असे त्याला वाटले असावे. मात्र, नेमकी त्यावेळी साहेबांची नजर त्याच्यावर पडली. ‘ये फोटो कशाला काढतोस तू ? बंद कर ते आधी,’ असा त्यांनी दमच भरला. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला अन् साहेबाच्या रुद्रावतारापुढे त्याला चांगलाच घाम फुटला.
---------
‘डास कसं फोडत्यात’
शिक्षणाशी संबंधित बड्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची प्रथमच लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नेमणूक झाली. मग या अधिकाऱ्यांनी यातून सुटका व्हावी, यासाठी वरिष्ठांना सांगून शिक्षणासंबंधी कामकाजावर परिणाम होईल, असा पत्रव्यवहारही केला. तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची ऑर्डर रद्द न करता कायम केली. मग नाईलाजवास्तव अधिकाऱ्यांनाही प्रथमच निवडणूक कामकाजात सहभागी व्हावे लागले. त्यात दोन दिवसांची ड्यूटी असल्याने मतदानाअगोदरच्या रात्री डास, असुविधांमुळे त्यांची झोप उडाली. याची चर्चा ‘डास कसं फोडत्यात’ म्हणून मतदानानंतरही अजून सुरू आहे.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com