आचारसंहितेचा खो

आचारसंहितेचा खो

विकासकामांना करावी लागणार प्रतीक्षा
आचारसंहिता पुढील महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचा परिणाम

कोल्हापूर, ता. १३ : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याने महापालिकेला अनेक विकासकामांना सुरूवात होण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच ई-बससाठीचे चार्जिंग स्टेशन, नवीन मशिनरी, डांबर प्लॅंट, पाईपलाईनचे व्हॉव्‍व्‍ह बदलण्यापर्यंतची अनेक कामे निविदा प्रक्रियाअभावी रखडली आहेत. यानंतर सुरू होणारा पावसाळा, पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येणार असल्याने कामांना खो बसण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाला पावसाळ्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
शहरातील प्रमुख १६ रस्त्यांच्या कामांनंतर आयआरबीने केलेल्या रस्त्यांची देखभाल तसेच इतर काही रस्ते करण्यासाठी ९० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. त्याची मंजुरीच आचारसंहितेत अडकली आहे. पॅचवर्कसाठी स्वतःचा डांबरी प्रकल्प सुरू करण्यासाठीची निविदाही अडकली आहे. ती वेळेत पूर्ण केली असती तर या उन्हाळ्यात रस्त्यांचे पॅचवर्क तरी महापालिकेला करता आले असते. तसेच स्वच्छ भारत अभियानातून महापालिकेला स्विपिंग मशिनरी, जेट मशीन दिली जाणार आहे. ते कामही आचारसंहितेमुळे रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी जेट मशीन उपलब्ध झाले असते तर ड्रेनेज लाईनची स्वच्छता करता आली असती. पण, आता पावसाळ्यात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वाढतील व मैलामिश्रित सांडपाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागण्याची चिन्हे आहेत.
अमृत दोनमधील प्रस्तावित केलेली व पंचगंगा प्रदूषणासाठी आवश्‍यक असलेले नाले वळवणे, एसटीपी, ड्रेनेज लाईन या कामांची मंजुरी राज्य सरकारकडून लटकली आहे. त्याला जर तातडीने परवानगी मिळाली नाही तर प्रदूषण रोखण्यासाठीची ही कामे लांबणार आहेत. परिणामी, पुढील उन्हाळ्यात प्रदूषणाचा प्रश्‍न पुन्हा भेडसावेल.
थेट पाईपलाईनचे पाणी कसबा बावडा व सी, डी वॉर्डला देण्यासाठीच्या पाईपलाईनवरील व्हॉल्‍व्‍हची स्थिती नियोजनात खोडा घालत आहे. अनेक ठिकाणी गळती आहे तर काही ठिकाणी ते नादुरुस्त होत असल्याने त्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसतो. यासाठी या दोन्ही लाईनवरील महत्त्‍वाचे सात व्हॉव्हॉल्‍व्‍ह बदलण्याचे नियोजन आहे. त्याची मंजुरी अजून झालेली नाही. आचारसंहितेमुळे त्याला पुढील महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर काम सुरू होण्यास बराच कालावधी जाणार आहे. या कालावधीत व्हॉल्‍व्‍हमुळे पाणी नियोजन विस्कळीत होऊ शकते.

चौकट
पादचारी पूल काम नाही
परीख पुलाजवळील रेल्वे मार्गावरून पलीकडे जाण्यासाठी पादचारी पूल प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्या कामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात होणार होती, असे सांगितले जात असले तरी रेल्वेकडून सध्या आराखड्याची मंजुरी शिल्लक आहे. त्यानंतर काम सुरू होईल, असे महापालिकेकडून सांगितले जाते. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात परीख पुलाखालूनच नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com