संभाजी महाराज जयंती मिरवणूक

संभाजी महाराज जयंती मिरवणूक

फोटो -83717, 83718
धनगरी ढोलचा ठेका, शिवकालीन युद्धकलेचा थरार
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील मंडळांच्या मिरवणुका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : धनगरी ढोलचा ठेका, शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके व विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळांतर्फे आज मिरवणुका काढण्यात आल्या. साऊंड सिस्टिमचा दणका मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला, तर वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पर्यायी मार्ग शोधताना नागरिकांची दमछाक झाली.
संभाजी महाराज जयंतीनिमित्त मंडळांनी साऊंड सिस्टिम मिरजकर तिकटी व खरी कॉर्नर परिसरात दुपारीच आणली होती. संयुक्त राजारामपुरी, विचारेमाळ येथील हिंदवी ग्रुप, छत्रपती संभाजी महाराज रविवार पेठ उमा टॉकीज चौक, संयुक्त शाहूपुरी, संयुक्त छत्रपती संभाजीनगरच्या मिरवणुका सायंकाळी मिरवणूक मार्गावर आल्या.
संयुक्त शाहूपुरीच्या मिरवणुकीचे उद् घाटन शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. रमेश पूरेकर, अमर समर्थ, कुलदीप देसाई, संजय पटकारे, अजय मोहिते, शुभम पवार, प्रशांत नलावडे, साईराज पाटील, संग्राम बावडेकर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कृष्णराज महाडिक यांनी संयुक्त राजारामपुरीच्या मिरवणुकीचे उद् घाटन केले. धनगरी ढोलच्या ठेक्याने मिरवणुकीत रंगत आणली, तर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. सिद्धीविनायक मर्दानी आखाडा, संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाडा, शांतीदूत मर्दानी आखाडा, शिवाजी पेठ हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाड्यातील खेळाडूंची लाठी, पट्टा, फरी गदका, तलवार, लिंबू काढणीची प्रात्यक्षिके सादर केली. खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मिरवणुकांचा मार्ग होता. लेझर शोच्या झगमगाटात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.
-------------------
चौकट
वाहनधारकांनी शोधला पर्यायी मार्ग
मंडळांच्या मिरवणुका दुपारीच मार्गावर होत्या. मात्र, सायंकाळी महाद्वार रोडवर जाण्याच्या उद्देशाने त्या जागीच थांबून होत्या. खासबाग मैदान परिसरात थांबलेल्या मंडळांना पोलिसांनी थेट मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर परिसरात हलवले. हा रस्ता दुचाकी, चारचाकी वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागला.
--------------------
चौकट
आवाजाचा नागरिकांना त्रास
शिवजयंतीच्या मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचा नागरिकांना त्रास झाला. त्याचा प्रत्यय पुन्हा नागरिकांना आला. झगमगाटाच्या रोषणाईने अनेकांना सावधगिरीने चालावे लागले, तर ज्येष्ठ नागरिक, मुले-मुली, महिला यांनी मिरवणूक मार्गावरुन न जाता पर्यायी मार्गावरुन जाणे पसंत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com