गडहिंग्लजला हवे साडेसहा टन बियाणे

गडहिंग्लजला हवे साडेसहा टन बियाणे

गडहिंग्लजला हवे साडेसहा टन बियाणे
खरीप हंगाम नियोजन ः १८ हजार हेक्टरवर पेरणीसाठी कृषी यंत्रणा झाली सज्ज
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ ः तालुक्यातील १८ हजार ४३० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होणार आहे. भात, सोयाबीन, भुईमूग, मिरचीसह तृणधान्य, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन तालुक्यात घेतले जाते. या पेरक्षेत्रासाठी तालुक्याला साधारण साडेसहा टन बियाण्यांची गरज असून, बहुतांश बियाणे बाजारात दाखल झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुधाकर खोराटे यांनी दिली.
खरीप हंगामातील पेरक्षेत्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सज्ज केले असून, शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, उगवण क्षमतेची चाचणी कशी करावी यादृष्टीने मार्गदर्शन केले जात आहे. बियाणे खरेदीवेळी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याचीही जागृती केली जात आहे. तालुक्यात महाबीजसह खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाणे विक्रीसाठी दाखल होत आहेत. सध्या भात, तूर, उडीद बियाणे दाखल झाली आहेत. लवकरच सोयाबीन बियाण्याचीसुद्धा आवक सुरू होणार आहे. ७० टक्केपेक्षा अधिक उगवण झालेले बियाणेच पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला असून, ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल असल्याची खात्री करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, खते आणि बियाण्यांचा शेतकऱ्यांना योग्य व गुणवत्तापूर्ण होते की नाही, याच्या निरीक्षणासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची नेमणूक केली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या पथकात पंचायत समिती कृषी अधिकारी सचिव असून, मंडळ कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तालुका पातळीवर तक्रार निवारण कक्षही स्थापन केले असून बियाणे, खताविषयी तक्रार असल्यास तालुका कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
----------
दृ.ष्टक्षेपात खरीप पेरणी (हेक्टरमध्ये)
- भात ः ८८९०, ज्वारी ः १२०, नाचणी ः ८४०, मका ः ६०
- तूर ः २४०, मूग ः ११०, उडीद ः ७०, इतर कडधान्ये ः ८०
- सोयाबीन ः १२२००, भुईमूग ः ६२३०
------------------------------------
* आवश्यक बियाणे (क्विंटलमध्ये)
- भात ः २०२२, ज्वारी, तूर ः प्रत्येकी ९, मूग ः ६.६०
उडीद ः ७.८०, सोयाबीन ः २९२८, भुईमूग ः २४९.२०
(याव्यतिरिक्त घरातील बियाण्यांचाही वापर होतो.)
-----------------------------------
* बियाणे खरेदीवेळी घ्यावयाची काळजी
- अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे घ्यावीत. त्याची पावती जपून ठेवावी.
- खरेदी केलेले बियाण्यांची पिशवी, टॅग, पावती व काहीसे बियाणे कापणापर्यंत जपावे
- चालू हंगामासाठी बियाणे शिफारस केल्याची खात्री करावी
- भेसळ रोखण्यासाठी बियाण्यांची सीलबंद पाकिटेच घ्यावीत
- पाकिटावरील अंतिम मुदत पाहावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com