

कोल्हा, गवा, हत्ती यांचा फोटो वापरावा.
-------
हिंस्र प्राण्यांचा गावालगतचा वावर धोकादायक
माणसांवर हल्ले वाढले; खाद्याची सहज उपलब्धता हेच कारण
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : अडकूर (ता. चंदगड) येथील तिघांवर कोल्ह्याने हल्ला करून जखमी केले. हत्ती, गव्यांपाठोपाठ आता कोल्ह्यासारख्या हिंस्र प्राण्यांचा गावालगतचा वावर वाढू लागला आहे. आणीबाणीच्या स्थितीत हे प्राणी माणसांवर हल्ले करत आहेत. त्यांना आवश्यक असणारे खाद्य गावालगत उपलब्ध होत असल्याचा हा परिणाम आहे.
वीस वर्षांत या विभागात गव्यांची संख्या वाढली. त्यांना आवश्यक असणारे खाद्य जंगलात पुरेसे नव्हते. त्याचवेळी विविध पाणी प्रकल्पांमुळे जंगलालगतच्या शेती, शिवारात बारमाही हिरवी पिके आकर्षित करू लागली. खाद्यासाठी त्यांनी मोर्चा मालकी हद्दीकडे वळवला. रोखण्याचा प्रयत्न झाल्यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर हल्ले सुरू झाले. येथूनच शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली. त्याआधी रानडुक्कर व इतर प्राणी शेतकऱ्यांच्या आवाक्यात होते. मात्र, गवे आणि त्या पाठोपाठ आलेले हत्तीसारखे अजस्र प्राणी रोखणे आवाक्याबाहेरचे ठरले. अलीकडे कोल्हे, लांडग्यासारख्या प्राण्यांचा वावर गावच्या वेशीपर्यंत आल्याचे निदर्शनास येत आहे. लहान-मोठ्या बाजारपेठेची गावे, पोल्ट्री व्यावसायिक, चिकन व्यावसायिक तसेच हॉटेलमधून वेस्ट मटेरियल गावच्या वेशीत आणि जंगलालगत उघड्यावरच टाकल्याचा हा परिणाम असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा खाद्यासाठी कुत्र्याप्रमाणेच कोल्ह्यांत झुंज लागल्याचे प्रसंग पाहिल्याचे अधिकारी सांगतात. जखमी प्राणी पिसाळल्यास तो अत्यंत हिंस्र बनतो. तो खाण्यामध्ये व्यस्त असताना तेथून एखादी व्यक्ती गेल्यास त्यांच्यावर तो हल्ला करतो. त्याच्या वर्तनाविषयी माणूस अनभिज्ञ असतो. अनेकदा आपल्या बाजूला वन्य प्राणी आहे याचेही त्याला भान नसते. तो सहजपणाने रस्त्याने चालत असतो किंवा वाहन चालवत असतो. मात्र, वन्य प्राणी भक्ष्य खात असताना माणसाच्या उपस्थितीने विचलित झाल्यास एक तर ते जंगलाच्या दिशेने धूम ठोकतात, काही अंतरावर जाऊन सुरक्षिततेचा अंदाज घेतात किंवा समोरच्या व्यक्तीवर थेट हल्ला करतात.
--------
जागरूक राहाणे आवश्यक
वन्य प्राण्यांकडून हल्ल्याचे प्रमाण दुर्मीळ असले तरी दुर्दैवाने हल्ला झाल्यास जीवावर बेतू शकते. ते टाळण्यासाठी माणसानेच खबरदारी घ्यायला हवी. पोल्ट्री वेस्ट, तसेच उपाहारगृहातील नासाडी झालेले अन्न उघड्यावर न टाकता या व्यावसायिकांनीच त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नागरिकांनी जंगलालगतच्या शेताकडे जाताना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत जागरूक राहणे हाच उपाय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.