

ajr213.jpg.....
85013
आजरा ः येथील लेंडओहळवर पडलेल्या भगदाडाची पाहणी करताना कंपनीचे अधिकारी व त्यांच्याशी चर्चा करताना नागरिक. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
-------------------------
लेंडओहळवरील मोरीचे स्ट्रक्चरल ऑडिट
तहसीलदार कार्यालयातील बैठकीत निर्णय ः रस्त्याचे काम बंदच, नवीन पुलाची मागणी कायम
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः येथील तहसीलदार कार्यालयात आज लेंडओहळवरील रस्त्याच्या बांधकामाबाबत नागरिकांचे शिष्टमंडळ व महामार्गचे अधिकारी यांच्याशी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. मोरीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे कनिष्ठ अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. नागरिकांच्या शिष्टमंडळाने नवीन पूल उभारावा, अशी ठाम भूमिका घेतली. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत पुलाचे बांधकाम बंद ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
संकेश्वर- बांदा महामार्गावरील आजरा शहरातील लेंडओहळवरील पडलेल्या भगदाडावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याला सोमवारी नागरिकांनी विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे. येथे नवीन पुलाची उभारणी करावी, अशी मागणी लावून धरली. याबाबत आज येथील तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले, सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर आदी उपस्थित होते.
श्री. बामणे म्हणाले, ‘लेंडओहळमध्ये येणारा पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह मोठा आहे. मोरी जुनी असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पाणी छत्रपती संभाजी चौकात पसरते. त्यामुळे कंपनीने मोरीची डागडूजी न करता नवीन पूल उभा करावा.’ कनिष्ठ अभियंता अनिल पाटील म्हणाले, ‘पावसाळा तोंडावर आहे. पुलाची मंजुरी व अन्य तांत्रिक तसेच प्रशासकीय बाबी आहेत. त्यामुळे येथे स्लॅब टाकून रस्त्याचे काम करूया.’ याला नागरिकांनी विरोध दर्शवला. श्री. पाटील यांनी मोरीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यावर निर्णय घेतला जाईल. ऑडिट दोन दिवसांत करू, असे सांगितले. श्री. बामणे म्हणाले, ‘तात्पुरती दुरुस्ती केली तरी पावसाळ्यानंतर नवीन पूल बांधणीबाबत लेखी पत्र कंपनीने द्यावे.’ चर्चेत विजय थोरवत, गौरव देशपांडे, राजू विभुते, वाय. बी. चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
----------------
कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून भगदाडाची पाहणी
कंपनीचे अधिकारी यश चौधरी यांनी लेंडओहळला पडलेल्या भगदाडाची पाहणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता अनिल पाटील, पुलाचे बांधकाम तज्ज्ञ श्री. पाटील उपस्थित होते. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग लोंढे, वाय. बी. चव्हाण यांनी येथे नवीन पूल उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाण्याचा निचरा, मोरीतील ड्रेनेज पाईपची स्वच्छता यावर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.