पंचगंगा नदी प्रदूषण बैठक बातमी

पंचगंगा नदी प्रदूषण बैठक बातमी
Published on

85058
...
अडीच वर्षांत पंचगंगा सांडपाणीमुक्त करावी
जिल्हाधिकरी येडगे : महापालिकांना प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२१ ः ‘इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकांनी आपले प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील अडीच वर्षांत उभे करून पंचगंगा नदी सांडपाणीमुक्त करावी. नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठीचा विशेष प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला सादर करावा. नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी व्यवस्था विकसित करावी,’ अशा सूचना आज जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नाबाबत बैठक घेतली. या बैठकीला महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘कोल्हापूर महापालिकेतील सहा एम.एल.डी प्रक्रिया प्रकल्पाचे काम ऑक्टेबरअखेर पूर्ण करा. तसेच ४३ एम.एल.डी.क्षमता असणाऱ्या तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सप्टेंबर महिन्यात सुरू करा. शहरातील सात नाले प्रक्रिया प्रकल्पाकडे वळण्यासाठीचे आराखडा बनवून कार्यवाही करावी. इचलकरंजी येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करावी. सर्व प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी पुढील अडीच वर्षांत पूर्ण करून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावेत. महापालिका, ग्रामपंचायत यामधील सांडपाणी नदीत जाणार नाही, अशी व्यवस्था करून नदी सांडपाणीमुक्त करावी.’
या बैठकीला महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक प्रमोद माने, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, शहर जलअभियंता हर्षजित घाटगे, करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
...
मासे मरण्याचे कारण काय?
नदीमध्ये मासे मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचे नेमके कारण काय, याचा शोध मत्स्य विभागाने घ्यायचा आहे. नदीमधील मासेमारीचे ठेके बंद करण्यात आले आहेत.
...
नदीकाठच्या गावांचा विशेष प्रस्ताव
पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांच्या काठी असणाऱ्या ८९ गावांचे सांडपाणी नदीत जाते. या गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे या गावांचा विशेष प्रस्ताव बनवून तो राज्य शासनाला देण्याचे निश्चित करण्यात आले.
...
सोलापूरचा जैविक कचरा आलाच कसा?
सोलापूर येथील जैववैद्यकीय कचरा निर्मूलन करण्यासाठी कोल्हापुरात आणला होता. हा कचरा कोल्हापुरात आलाच कसा? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली.
...
बैठकीतील प्रमुख मुद्दे
- नदी सतत प्रवाही ठेवा.
- इचलकरंजीतील प्रोसेसिंग युनिटचे सांडपाणी प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी करावी.
- शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि सर्व्हिसिंग सेंटर यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करावा.
- साखर उद्योगातून सांडपाणी नदीत जाणार नाही, याचा आढावा साखर सहसंचालकांनी घ्यावा.
- नदीकाठी कपडे, जनावरे, वाहने धुणाऱ्यांवर कारवाई करा.
- नदी प्रदूषणावर लक्ष ठेवणारी ऑनलाईन यंत्रणा विकसित करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com