होर्डिंगचा धोका नाही, पण त्रुटींवर बोट

होर्डिंगचा धोका नाही, पण त्रुटींवर बोट

होर्डिंगचा धोका नाही, पण त्रुटींवर बोट
स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर ः महापालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ ः शहरातील होर्डिंग मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर केले आहे. यामध्ये कोणतेही होर्डिंग धोकादायक नसले तरी, किरकोळ त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे महापालिकेच्या बांधकाम विभागानेही स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. दोन्हीकडील प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
शहरात विविध ठिकाणी २२ होर्डिंग आहेत. घाटकोपर घटनेनंतर शहरातील होर्डिंगसह संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सात दिवसांत सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. अन्यथा, होर्डिंग हटवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार संबंधित होर्डिंगमालकांनी कार्यवाही केली आहे. होर्डिंग आणि इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यामध्ये कोणतेही होर्डिंग व इमारत धोकादायक नसल्याचे नमूद केले आहे. मात्र काही त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली.
दुसरीकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्याचाही अहवाल अधिकाऱ्यांना मिळाला आहे. दोन्हीकडील अहवालांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. एकेकाळी इचलकरंजी होर्डिंगचे शहर झाले होते; मात्र तत्कालीन पालिका सभागृहाने केलेल्या एकमुखी ठरावानंतर महापालिकेच्या जागेवरील सर्व होर्डिंग हटवले. खासगी जागेवर अटी आणि शर्थी घालून परवानगी दिली होती. त्यासाठी वार्षिक जाहिरात शुल्क आकारणी केली जाते. तुलनेने शहरात होर्डिंगचे प्रमाण नगण्य आहे.
-----------
सहा पेट्रोलपंप मालकांना नोटिसा
शहरातील सहा पेट्रोल पंप मालकांना महापालिकेने नोटीस काढली आहे. या पेट्रोल पंपावर होर्डिंग उभारले आहेत. पंप सुरू करीत असतानाच शासनाची जाहिरात करण्यासाठी हे होर्डिंग उभारल्याचे पंप मालकांनी महापालिका प्रशासनाला कळवले आहे. तथापि, त्याच्या परवानगीबाबत महापालिकेने पडताळणी सुरू केली आहे. परवानगी नसेल तर सात दिवसांत होर्डिंग काढून टाकण्याचा आदेश नोटिशीमध्ये दिला आहे. त्यामुळे याबाबतच्या पुढील कार्यवाहीकडेही लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com