खेळाडू आरक्षण प्रारूपला कबड्डीसह कुस्तीतून आक्षेप

खेळाडू आरक्षण प्रारूपला कबड्डीसह कुस्तीतून आक्षेप

खेळाडू आरक्षण प्रारूपला कबड्डीसह कुस्तीतून आक्षेप
हरकतींचा सपाटा; खेळ तज्ज्ञांशी चर्चेची मागणी, ऑलिंपिकपात्र खेळालाच मान्यता हवी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः ऑलंपिकसह जागतिक स्पर्धेत राज्याला पदक मिळवून नावलौकिक करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यासंदर्भात सुधारित प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम क्रीडा विभागाकडून सुरू आहे. मात्र, आराखडा विविध खेळ तज्ज्ञ, संघटनांशी चर्चा करता थेट प्रस्तावच तयार करण्याची घाई होत आहे. त्यावर जिल्ह्यातील कबड्डी, कुस्ती, ॲथलेटिक्स संघटनांसह अन्य खेळ प्रकारांतील खेळाडूंनीही हरकती नोंदविण्याचा सपाटा लावला आहे.
पाच टक्के खेळाडू आरक्षणाचे नियम बदलण्याचे संकेत शासनाच्या विचाराधीन आहेत. यासंदर्भातील पत्र तीन दिवसांपूर्वी काढले. त्यात हरकती, सूचना, आक्षेप मागविले आहेत. अत्यंत घाईघाईत हे आक्षेप चार जूनपर्यंत संकेतस्थळावर नोंदवावेत; असे आवाहन केले आहे. मात्र, सुधारित प्रस्ताव खेळाडूंवर अन्यायकारक आहे. त्यामुळे विविध खेळ तज्ज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघटक, क्रीडा संघटनांचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्‍यक होते. तसे न करता विभागाने थेट सूचना, हरकती मागविल्या आहेत. हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला तर बोगस संघटनांची चांदी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील कबड्डी, कुस्ती, ॲथलेटिक्स, क्रिकेट आदी संघटना, खेळाडूंनी हरकती नोंदविण्याचा सपाटा लावला.
.....
जाणकारांची मागणी अशी,
-ऑलिंपिकपात्र खेळांमधील पदक विजेत्यांनाच आरक्षणात प्राधान्य द्यावे.
- खेळ तज्ज्ञ, मार्गदर्शक, प्रशिक्षक, संघटक, राज्य संघटनेचे पदाधिकारी व ज्यांनी खेळासाठी आयुष्य वेचले यांच्याशी चर्चा आवश्‍यक आहे.
- हा आराखडा किमान महिनाभरासाठी सर्वसामान्य नागरीकांना अभ्यासासाठी ठेवणे आवश्‍यक होते.
- पॅराऑलंपिक खेळ, खेळाडूंचाही विचार घेणे आवश्‍यक.
- हाताच्या बोटावर मोजण्याइतपत खेळ, संघटनांचा विचार न करता सर्वच मान्यताप्राप्त संघटनांचा विचार करावा.
- ‘अ’ दर्जाच्या पदासाठी आशियाई, आॅलिंपिक, जागतिक विश्‍वचषक स्पर्धांमधील पदक विजेत्यांचा, तर ‘ब’, ‘क’ गटातील पदांकरिता राष्ट्रीय पदक विजेत्यांचा विचार करावा.
......
कोट
ज्या त्या खेळातील तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशिक्षकांशी चर्चा करून सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठवा. अन्यथा काही बनावट संघटनांचे खेळाडू याचा विनाकष्ट लाभ मिळवू शकतात. घाईघाईत प्रस्ताव तयार करून कमी वेळेत हरकती, आक्षेप मागविण्याच घाट घालणाऱ्या शुक्राचार्यांचा शोध घ्या.
- डॉ. रमेश भेंडिगिरी, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक

ऑलिंपिकपात्र खेळांतील चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच लाभ मिळावा. जेणेकरून आयुष्यभर कष्ट घेऊन देशासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचा विचार आवश्‍यक आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी विचारमंथन व्हावे.
- प्रकुल मांगोरे-पाटील, सचिव, कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन

कुस्तीसारख्या रांगड्या आणि कष्टदायी खेळाचा विचार प्रारूप आराखड्यात करावा. राज्यातील अत्यल्प कुस्तीगीर आशियाई, ऑलिंपिक, राष्ट्रकुलपर्यंत पोचतात. याचा सारासार विचार करून सुधारित आराखडा मंजूर करावा. जेणेकरून जास्तीत जास्त कुस्तीगीरांना आरक्षणाचा लाभ मिळेल.
- संग्रामसिंह कांबळे, राष्ट्रीय मल्ल व संघटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com