‘आयजीएम’मध्ये होणार २४ तास रक्त तपासणी

‘आयजीएम’मध्ये होणार २४ तास रक्त तपासणी

ich21.jpg
87381
इचलकरंजी : आयजीएम इमारत
----------
‘आयजीएम’मध्ये होणार २४ तास रक्त तपासणी
इचलकरंजीत रुग्णांना वेळेत उपचार होण्यास मदत
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : येथील ‘आयजीएम’ रुग्णालयात १ जूनपासून २४ तास रक्त तपासणी सुरू ठेवण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने संबंधित विभागास केल्या आहेत. त्यानुसार लॅब टेक्निशयन यांच्या वेळा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांत आयजीएममध्ये २४ तास रक्त तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे रुग्णालयात रात्री-अपरात्री आलेला रुग्ण रक्ताच्या अहवालाअभावी योग्य उपचारापासून वंचित राहणार नाही.
जिल्ह्यात सीपीआर रुग्णालयानंतर मोठे शासकीय रुग्णालय म्हणून इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाकडे पाहिले जाते. रुग्णालयात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ३०० बेडची मंजुरी मिळाल्याने रुग्णालयाची वाटचाल मल्टिस्पेशालिटीकडे होत आहे. रुग्णालयात होत असलेल्या सुधारणेमुळे अत्यावस्थेत असलेले रुग्णही दाखल होत आहेत. अशा रुग्णांवर तत्काळ उपचार होणे आवश्यक असते. योग्य उपचारासाठी रुग्णाच्या रक्ताचे अहवाल महत्त्वाचे असतात. सध्या आयजीएम रुग्णालयातील प्रयोगशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. परिणामी सायंकाळी ५ नंतर आलेल्या रुग्णांना रक्ताच्या चाचणी अहवालासाठी दुसऱ्‍या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारास मर्यादा होती. २४ तास प्रयोगशाळा सुरू ठेवण्यात येत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
आयजीएम रुग्णालयात दररोज सुमारे १ हजार २०० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यामधील २५० ते ३०० रुग्णांना वैद्यकीय अधिकारी रक्त चाचणीचा सल्ला देतात. त्यामधील काही चाचण्या आयजीममधील प्रयोगशाळेमध्ये, तर काही महालॅब म्हणजेच कोल्हापूर येथील प्रयोगशाळेमध्ये करण्यात येतात. सध्या आयजीएम रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या वेळेत बदल करून तीन शिफ्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्त तपासणी लॅब २४ तास सुरू राहणार आहे. त्याचा फायदा इचलकरंजी शहर परिसरातील रुग्णांना होणार आहे.
--------------------------------------
‘आकृतीबंध’प्रमाणे भरती आवश्यक
आयजीएम रुग्णालयात सध्या पाच लॅब टेक्निशियन कार्यरत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. ३०० बेडसाठीच्या मंजुरीने प्रयोगशाळेसाठी आकृतीबंध तयार करावा लागणार आहे. आकृतीबंधानुसार सुमारे १२ लॅब टेक्निशियन आणि ४ लॅब असिस्टंटची आवश्यकता भासणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
--------------------------------
रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत असून, अत्याधुनिक सोयी-सुविधाही उपलब्ध होत आहेत. रुग्णांना रक्त अहवालाअभावी उपचारास मर्यादा येऊ नयेत यासाठी २४ तास लॅब सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. नंदकुमार बणगे, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com