मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

फोटो ःKOP24M87410ः मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान
KOP24M87412-
कळंबा : येथील कारागृहातून कैदी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला.
..............
संशयित आरोपी-KOP24M87454 - ऋतुराज इनामदार
KOP24M87458 - प्रतीक उर्फ पिल्या पाटील
KOP24M87459 - बबलू उर्फ संदीप चव्हाण
------------------------

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून
अंघोळीवेळी ड्रेनेजच्या झाकणाने डोके ठेचले; पाच बंद्यांचे कृत्य, हल्ल्यात सुरक्षा रक्षक जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ५९, रा. शक्ती चेंबर, मस्जिद बंदर, मुंबई) याचा आज सकाळी कळंबा मध्यवर्ती कारागृहात खून करण्यात आला. तो सकाळी सातच्या सुमारास अंघोळीला बसला असताना पाच बंद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. ड्रेनेजवरील सिमेंटचे झाकण उचलून त्याच्या डोक्यात घातल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी हल्ला रोखण्यास गेलेले कारागृह पोलिस धीरज शिंदेही जखमी झाले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तसेच ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब पथक, श्‍वान पथकाच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. उद्या (सोमवारी) सकाळी ‘इन कॅमेरा’ मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली.
या प्रकरणी मोकातील न्यायाधीन बंदी प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील (रा. इस्लामपूर, सांगली), संदीप शंकर चव्हाण (रा. मोरे कॉलनी जत, सांगली), ऋतुराज विनायक इनामदार (रा. विक्रमनगर, कोल्हापूर), तर खुनाच्या गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत (रा. कुपवाड, मिरज), सौरभ विकास सिद (वाळवा, जि. सांगली) या पाच जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व बंदी कारागृहातील सर्कल क्र. २ मध्ये मुन्नासोबत एकत्रित होते. या प्रकाराची माहिती मिळताच कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठेही पुण्याहून कोल्हापुरात दाखल झाल्या.

हल्ल्याबाबत स्वाती साठे यांनी दिलेली माहिती अशी : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा न्यायालयाने २००६ मध्ये दोषी ठरवलेला मुन्ना याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रत्यक्षात तो १९९३ च्या घटनेपासूनच पोलिस कोठडीत नंतर न्यायालयीन कोठडीत होता. मुंबई सेंट्रल जेलमधून २०१३ मध्ये मुन्ना याला कळंबा कारागृहात आणले होते. त्याच्यासह मुंबई बॉम्बस्फोटातील अन्य चार आरोपीही कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

अंघोळीवेळी झाला हल्ला...
मुन्ना सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळीला आला. याचवेळी त्याच्या बरॅकमधील बंदीही अंघोळीला आले. यावेळी संशयित बंद्यांसोबत त्याचा वाद झाला. यातून प्रतीक ऊर्फ पिल्या पाटील, बबलू ऊर्फ संदीप चव्हाण, सौरभ सिद, ऋतुराज ऊर्फ डेज्या इनामदार, दीपक खोत या पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. ड्रेनेजच्‍या सिमेंटच्‍या व लोखंडी झाकणाने डोक्यात, पाठीत, कपाळावर, हातापायावर घाव घातल्याने मुन्ना जागीच ठार झाला.

पोलिस कर्मचारी जखमी
प्रत्येक बरॅकमधील बंदी बाहेर सोडताना तेथे देखरेखीसाठी पोलिस कर्मचारी तैनात असतो. मुन्नाला मारहाण सुरू असताना कर्तव्यावरील पोलिस धीरज शिंदे तेथे आले. ते हल्लेखोरांना अडवत असताना सौरभ सिदने शिंदे यांना हौदावरून खाली ढकलून दिले. पिल्या पाटील व दीपक खोत यांनी ड्रेनेजची झाकणे, बादली पोलिस शिंदे याच्या दिशेने भिरकावल्याने तेही जखमी झाले.

तापट स्वभावाचा मुन्ना...
मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी अटक केलेला मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान याला मुन्ना गुप्ता नावानेच ओळखले जात होते. तो अत्यंत तापट व चिडखोर स्वभावाचा होता. यापूर्वीही त्याने राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत अन्य बंद्यांसोबत भांडण, हाणामारीचे प्रकार केल्याचे कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी सांगितले. त्याच्या अशा स्वभावामुळे अनेकदा त्याला समजही दिली होती.

नेमके कारण गुलदस्त्यात...
मुन्ना याचा संबंधित पाचजणांसोबत यापूर्वी वाद झाला होता का, याची माहिती पोलिस घेत आहेत. मागील काही दिवसांतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणीही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी नेमका कोणत्या कारणावरून मुन्नावर हल्ला केला. रविवारी सकाळी कारागृहात त्यांच्यात काय घडले, याचा तपास पोलिस करीत आहेत.

न्यायाधीशांसमोर पंचनामा...
घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस कळंबा कारागृहात दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर ‘इन कॅमेरा’ करण्यात आला. याचवेळी ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही कारागृहाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पुण्याहून आलेल्या पथकातील पोलिस निरीक्षक विजय कांबळे, मंजिरी कुलकर्णीही तपास करीत आहेत.


चौकटः

हल्लेखोर गंभीर गुन्ह्यातील संशयित....
संशयित----पोलिस ठाणे व गुन्हा------कारागृहात दाखल
प्रतीक ऊर्फ पिल्या पाटील-- इस्लामपूर , खून व मोका-- ऑगस्ट २०२०
संदीप शंकर चव्हाण---जत - खून व मोका-----मार्च २०२३
ऋतुराज विनायक इनामदार----शाहूवाडी - मोका---मार्च २०२०
दीपक नेताजी खोत----तासगाव - खून---जून २०२२
सौरभ विकास सिद ----कवठेमहंकाळ - खून----२०२२


मोबाईल, गांजाने गाजलेले कारागृह...
मोबाईलचा वापर व अमली पदार्थांमुळे कळंबा कारागृहची बदनामी यापूर्वी झाली होती. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन काही दिवसांपूर्वीच तत्कालीन दोन अधिकारी, नऊ कर्मचारी निलंबित केले होते. यानंतर ‘ऑपरेशन कोल्हापूर क्लीन’ मोहिमेंतर्गत एप्रिलपासून १०० हून अधिक मोबाईल शोधले होते. अशातच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कारागृहात खून झाल्याने कळंबा मध्यवर्ती कारागृह पुन्हा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.


मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा नकार.....
सीपीआरमध्ये सोमवारी सकाळी मुन्नाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा होणार आहे. कारागृह प्रशासनाने ही माहिती मुन्नाच्या पत्नीला दिली. तसेच मृतदेह घेण्यासाठी येणार आहात का, अशी विचारणा केली. यावर केरळमध्ये असणाऱ्या त्याच्या पत्नीने साफ नकार दिला. यानंतर मुन्नाच्या उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या भावाशीही संपर्क करण्यात आला. त्याने कोल्हापुरात येण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र, तो न आल्यास ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रशासन मुन्नाच्या मृतदेहावर अंत्यविधी करेल, असेही साठे यांनी यावेळी सांगितले.
...................
न्यायालयीन प्रक्रियेनंतर संशयितांचा ताबा
खुनातील संशयितांचा ताबा घेण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांना न्यायालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या न्यायालयांकडे हा अर्ज सादर केला जाईल. त्या न्यायालयांच्या परवानगीने संशयितांचा कारागृहातून ताबा घेण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
............
गतवर्षीही चेष्टा मस्करीतून खून
गतवर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये सतत चेष्टा केल्याच्या रागातून सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा (वय ३९, रा. सायन कोठीवाडा, मुंबई) याचा कळंबा कारागृहात खून झाला होता. झोपलेल्या स्थितीत असताना गणेश लक्ष्मण गायकवाड (रा. वाशी, मुंबई ) या कैद्याने त्याचा खून केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com