सर, विचार करुन तुम्हाला सांगतो!

सर, विचार करुन तुम्हाला सांगतो!

सर, विचार करून तुम्हाला सांगतो!
४२ टक्केच्या विद्यार्थ्याचे उत्तर : कला शाखेचे प्राध्यापक झाले हतबल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : यंदा दहावीच्या छप्पर फाडके निकालाने विद्यार्थ्यांना गुणांचे दान भरभरून दिले आहे. टक्केवारीच्या फुगवट्यामुळे विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखा, अभियांत्रिकी पदविकेकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे अकरावी कला शाखेसाठी विद्यार्थी मिळवताना नाकीनऊ येत आहे. ४२ टक्केच्या विद्यार्थ्यानेही ‘सर विचार करून तुम्हाला सांगतो’ असे शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दिलेले उत्तर सारे काही सांगण्यास पुरेसे ठरणार आहे.
दहावीचा ऑनलाइन निकाल आठवडाभरापूर्वी जाहीर झाला. गडहिंग्लज तालुक्याचा ९८.९६ टक्के निकाल लागला. २९५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अवघे ३१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तब्बल १६१४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर ९२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यावरून निकालाची कल्पना येते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहेच. पण, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक टक्केवारीतही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते.
वास्तविक शाळांकडून दिले जाणारे गुण आणि बेस्ट ऑफ फाईव्हच्या धोरणामुळे टक्केवारी वाढलेली दिसते. गुणांचा हा फुगवटा विद्यार्थ्यांना करिअरबाबत दिशाभूल करणारा ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यासाठी एक उदाहरण पुरेसे ठरणार आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचे शिक्षक विद्यार्थी मिळवण्यासाठी गावोगावी फिरत आहेत. कमी टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्यात ते गाठीभेटी घेत आहेत. पूर्व भागातील एका गावातील विद्यार्थ्याची त्यांनी भेट घेतली. ४२ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यानेही त्यांना विचार करून सांगतो म्हणत थेट प्रवेशाला नकार दिला. त्यामुळे हतबल होण्याची वेळ या प्राध्यापकांवर आली.
विद्यार्थ्यांनी कोठे, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, कशामध्ये करिअर करावे, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण, विद्यार्थ्यांना दहावीला मिळालेले भरमसाट गुण आणि त्यांचा कल लक्षात घेता कला शाखेला विद्यार्थी मिळणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे एक-एक विद्यार्थी मिळवण्यासाठी प्राध्यापकांची गावोगावी पायपीट सुरू आहे.
---------------
महाविद्यालये ८, प्रवेश क्षमता १२६०
गडहिंग्लजला शहरात जागृती, राजर्षी शाहू, संभाजीराव माने व गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय अशा चार, तर ग्रामीण भागातील नेसरी, महागाव, तेरणी, हलकर्णी, नूल, हिडदुग्गी, हेब्बाळ-जलद्याळ, कानडेवाडी येथे प्रत्येक एक अशा आठ कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखा आहे. या महाविद्यालयातील कला शाखेची एकूण प्रवेश क्षमता १२६० इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com