जरा ते थांबले असते, तर वेळ टळली असती

जरा ते थांबले असते, तर वेळ टळली असती

87658
...
पासबुक भरायला गेले ते आलेच नाहीत
डॉ. चव्हाण यांच्या पत्नी भावनाविवश; जरा थांबले असते, तर वाईट वेळ टळली असती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘बँकेतून पासबुक भरायला म्हणून ते घरातून गेले आणि पुन्हा आलेच नाहीत. जरा ते थांबले असते, तर ही वाईट वेळ टळली असती’, असे सांगत माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या पत्नी सुनीता भावनाविवश झाल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. वैभव हौसिंग सोसायटीमधील ‘स्वामी समर्थ विहार’ या निवासस्थानी शोककळा पसरली.
डॉ. चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच शेजारी, नातेवाईक, सोसायटीमधील सदस्य, शिवाजी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पत्नी सुनीता यांना तर मोठा धक्का बसला. नातेवाइकांना पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘बँकेतील काम करण्यासह पासबुकही भरून आणतो म्हणून दुपारी दोनच्या सुमारास ते घरातून चारचाकी घेऊन एकटेच बाहेर पडले. मी त्यांना राहू द्या, थोडा वेळ थांबा असे म्हणत होतो. पण, लगेच येतो म्हणून ते निघाले आणि पुन्हा आलेच नाहीत. त्यांनी माझं ऐकले असते, तर बरे झाले असते, असे सांगत त्या भावनाविवश झाल्या. त्यांना पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले. दरम्यान, डॉ. चव्हाण यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बोरवडे आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांपूर्वीपासून ते कोल्हापुरातील वैभव सोसायटीमध्ये स्थायिक झाले. सध्या पत्नी सुनीता आणि मुलगा अवधूत यांच्यासमवेत ते राहत होते. प्राजक्ता आणि पल्लवी या दोन्ही विवाहित मुली परदेशात आहेत.
...
बाथरुममध्ये पडल्याने दुखापत
गेल्या दीड आठवड्यांपूर्वी डॉ. चव्हाण हे घरातील बाथरुममध्ये पडले होते. त्यामध्ये त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली होती. त्या जखमेला ड्रेसिंग केले होते, असे निवासस्थानी आलेल्या मित्र, शेजाऱ्यांनी सांगितले.
...
शिक्षणक्षेत्रातील ३६ वर्षांची कारकिर्द
डॉ. चव्हाण यांची शैक्षणिक क्षेत्रातील कारकिर्द श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ज्युनिअर कॉलेजमधून झाली. त्यानंतर सायबर इन्स्टिट्यूट आणि पुढे भारती विद्यापीठाचे संचालक, शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू, प्र-कुलगुरुपदावर त्यांनी काम केले. भारती विद्यापीठाच्या दिल्लीतील इन्स्टिट्यूटच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले. शिवाजी विद्यापीठात अश्वमेध क्रीडा स्पर्धा, सिंथेटिक ट्रॅकसाठी राज्य शासनाकडून निधी मंजुरीमध्ये त्यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. ‘नॅक’चे सल्लागार म्हणून त्यांनी विविध महाविद्यालयांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी ३६ वर्षे योगदान दिले.
...
मुलगा आल्यानंतर अंत्यसंस्काराचा निर्णय
डॉ. चव्हाण यांचा मुलगा अवधूत त्यांच्या मित्रांसमवेत हिमाचल प्रदेशला गेले आहेत. वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ते कोल्हापूरला येण्यासाठी तेथून निघाले आहेत. ऑस्ट्रेलियातील मुलगी पल्लवी आणि अमेरिकेतील प्राजक्ता या देखील तेथून येत आहेत. उद्या (मंगळवारी) अवधूत कोल्हापुरात आल्यानंतर डॉ. चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचा निर्णय होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com