सोयाबीनची मूल्यसाखळी होणार बळकट

सोयाबीनची मूल्यसाखळी होणार बळकट

87655
सोयाबीनची मूल्यसाखळी होणार बळकट
शेतकरी कंपनी स्थापणार ः गोदामासह प्रक्रिया उद्योगाद्वारे मूल्य मिळविण्याची संधी
अजित माद्याळे ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः सोयाबीनला मार्केटमध्ये अधिकाधिक मूल्य मिळवून देत शेतकरी कुटुंबात आर्थिक उन्नती साधण्याच्या हेतूने मूल्यसाखळीची संकल्पना तीन वर्षांपासून राबवली जात आहे. दोन वर्षे तालुक्यातील एक हजार हेक्टरसाठी मोफत सोयाबीन बियाणे वाटप करून शेतकऱ्यांचे दहा गट स्थापन केले आहेत. या गटांना यंदाच्या तिसऱ्या वर्षी गोदामासह सोयाबीनवर प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी पाठबळ मिळणार असून, या माध्यमातून सोयाबीन मूल्यसाखळी बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गडहिंग्लजला दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीनपासून अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. सोयाबीनची खरेदी करून त्यापासून बनवल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून मोठा नफा मिळू शकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन व त्याच्या उत्पादनांना मागणी विचारात घेऊन कृषी विभागाने सोयाबीनचे उत्पादन व त्याची मूल्यसाखळी बळकट करण्याचे धोरण अवलंबले आहे.
दरम्यान, या संकल्पनेतून गडहिंग्लज तालुक्यात कृषी खात्यातर्फे २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्ही वर्षी अनुक्रमे ३०० व ७०० हेक्टरसाठी मोफत सोयाबीन बियाणे वाटप केले. केवळ बियाणे वाटप करून न थांबता यापुढेही मूल्यसाखळी अधिकाधिक कशी बळकट होईल, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. एक हजार हेक्टरमधून प्रत्येकी शंभर हेक्टरचे दहा शेतकरी गट तयार केले आहेत. या शेतकरी गटांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी स्थापन करावयाची आहे. त्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांची बैठक घेऊन योजनेची माहिती देणार आहे. आपणच पिकवलेल्या सोयाबीनपासून विविध उत्पादने बनवण्याची संधी त्यांना आहे. याशिवाय गोदाम योजनाही असून कंपनीच्या सभासद शेतकऱ्याला सोयाबीन साठवता येणार आहे. चांगला दर आल्यानंतर त्याची विक्रीही शेतकरी करू शकणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.
-----------------------
दृष्टिक्षेपात मूल्यसाखळी
- ६२ गावांतील १ हजार हेक्टरमध्ये दिले मोफत बियाणे
- सरासरी १२५-१५० शेतकऱ्यांचा एक गट तयार
- खरेदी-विक्रीतून दलालांकडून होणारे आर्थिक शोषण थांबणार
- प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्याची संधी
- पिकवण्यापासून मार्केटपर्यंत ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादने तयार करणे
---------------------------
गडहिंग्लजमधील सोयाबीन (आकडे सरासरी)
- क्षेत्र ः १२ हजार हेक्टर
- उत्पादकता ः प्रति हेक्टर २६ क्विंटल
- वार्षिक उत्पादन ः ३०० टनांपर्यंत
-----------------
काय आहेत उद्योग
मूल्यसाखळी संकल्पनेतील पुढचा टप्पा म्हणून सोयाबीनपासून उत्पादनांच्या निर्मितीकडे पाहिले जात आहे. त्यातून स्थापन होणाऱ्या शेतकरी कंपनीसाठी बीज प्रक्रिया युनिट, औषध फवारणीसाठी ड्रोन खरेदी, जैविक निविष्ठेसाठी प्रयोगशाळा उभारणी, गोदाम बांधकाम, ग्रेडिंग युनिट, सुधारित सायलो तंत्रज्ञान आदी घटक समाविष्ट केले आहेत. गट स्थापनेसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. पिकणाऱ्या भागातच सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास कंपनीला होणारा फायदा शेतकरी सभासदांना उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com