सतेज किंगमेकर

सतेज किंगमेकर

88036
...
सतेज पाटील ठरले ‘किंगमेकर’

जोडण्या यशस्वी ः राज्य आणि देश पातळीवरील नेत्यांचे वेधले लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः निवडणूक मग ती कोणतीही असो त्यात झोकून देऊन उतरण्याची तयारी, स्वतः उमेदवार समजून केल्या जाणाऱ्या जोडण्या, प्रचारापासून ते निकालापर्यंत सूक्ष्म नियोजन, जे करायचे ते मनापासून आणि ताकदीने करण्याची हातोटी, हातात असलेली मोठी यंत्रणा, त्याच्या जोडीला आर्थिक ताकद यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने जिल्ह्यात २५ वर्षांनंतर त्यांनी पक्षाचा खासदार निवडून आणला. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे त्यांनी लक्ष्य वेधले असून, त्यातून त्यांना पक्षात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांनी २००४ मध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांची उठबस माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत होती, पण महापालिकेच्या राजकारणात या दोघांत मतभेद झाले, त्यातून निर्माण झालेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला. त्याची परिणती महाडिक विरुद्ध पाटील या राजकीय वैरात झाली. त्याची पहिली झलक २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील यांच्याविरोधात खासदार धनंजय महाडिक यांच्या लढाईने झाली. गेली १५ वर्षे या दोघांत राजकीय वाद आहे, त्याचे पडसाद आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांत कमी-अधिक प्रमाणात उमटत गेले.
विशेषतः २०१४ च्या विधानसभेतील पराभवानंतर पाटील अधिक मुत्सद्दी राजकारणी म्हणून पुढे आले. त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या, त्यात ते महाडिक यांच्यापेक्षा सरस ठरत गेले. २०१६ च्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी महादेवराव महाडिक यांचाच पराभव करून २०१४ च्या पराभवाचे उट्टे काढले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत महाडिक यांचे पुत्र अमल यांचा पराभव करून पुतणे ऋतुराज पाटील यांना त्यांनी ‘दक्षिण’ मधून आमदार केले. मग ‘गोकुळ’ची सत्ता मिळवली. २०१४ ला लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला, पण त्यांनीच विधानसभेला घात केल्यानंतर २०१९ च्या लोकसभेत ‘आमचं ठरलंय’ म्हणत थेट त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यामागे ताकद लावली. त्यातून प्रा. मंडलिक पावणेतीन लाख मतांनी विजयी झाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती, पण २०१९ च्या निवडणुकीत तीन जागा त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून खेचून आणल्या तर हातकणंगलेतही त्यांनी आपली ताकद लावली. कोल्हापूर उत्तरच्या २०२२ च्या पोटनिवडणुकीतही ते स्वतः रिंगणात असल्यासारखे राबले आणि जयश्री जाधव यांना निवडून आणले. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात तुम्ही फक्त जागा काँग्रेसकडे द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी म्हणत त्यांनी याही निवडणुकीत कोल्हापुरातील प्रा. जयंत आसगांवकर यांना विजयी केले.
...
लोकसभेलाही करिष्मा कायम
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे अनपेक्षितरीत्या पराभूत झाले होते. हा पराभव छत्रपती घराण्याइतकाच सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. या निवडणुकीनंतर छत्रपती घराणेही राजकारणापासून काहीसे अलिप्तच होते, पण राज्यात राष्ट्रवादी व शिवसेना फुटली, तेव्हापासूनच कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण उमेदवार कोण, याविषयी मोठी उत्सुकता होती. अलीकडच्या काही घडामोडी पाहता शाहू महाराज हे उमेदवार निश्‍चित होते. पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला तर घेतलीच, पण शाहू महाराजांना रिंगणात उतरून या घराण्यावर १५ वर्षांनंतर गुलाल उधळण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांनी आपला करिष्मा दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com