कोल्हापूरची तापमान वाढ रोखणार

कोल्हापूरची तापमान वाढ रोखणार

88210
...
कोल्हापूरची तापमानवाढ रोखणार

पर्यावरणप्रेमींचा निर्धार; कृती कार्यक्रम संघटितपणे राबविणार, शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः प्रबोधन, कृती कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरची तापमानवाढ रोखण्याचा निर्धार आज पर्यावरणप्रेमींनी शिवाजी विद्यापीठात केला. त्यांनी तापमानवाढीचे स्थानिक परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित केले.
पर्यावरण दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘कोल्हापूर ४१ अंश सेल्सिअस’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ज्येष्ठ वनस्पतीतज्‍ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. डी. राऊत होते.
चर्चासत्रात डॉ. आसावरी जाधव यांनी ‘शहरी उष्णताद्वीप’ या विषयावर मांडणी केली. यामध्ये शहरी भागात उष्णता वाढवणाऱ्या विविध कारणांचा जसे की, डांबरीकरण, काँक्रिटचा अतिवापर, उंच इमारतींमुळे कमी झालेले वायुविजन, कमी झालेले वृक्ष आच्छादन या कारणांची त्यांनी माहिती दिली. उदय गायकवाड यांनी कोल्हापूर शहराच्या विशिष्‍ट अशा गुणधर्मांचा आणि सांख्यिकीचा आलेख मांडला. त्यामध्ये गेल्या शंभर वर्षात झालेली लोकसंख्या वाढ, बदललेला जमीन वापराचा पॅटर्न, मोकळ्या जागांचे झालेले हस्तांतरण, बागांची दुरवस्था, रस्त्याकडेची कमी झालेली झाडी असे मुद्दे मांडले. याबाबतचे प्रश्न हाताळण्यासाठी कोणत्या गोष्टी अंगिकाराव्या लागतील याची माहिती दिली.
जगन्नाथ साळोखे यांनी शासनाची भूमिका, नेट झिरोच्या दृष्टीने वाटचाल आणि प्रत्येकाने कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी त्यांच्या मांडणीमध्ये वृक्षांचे महत्त्‍व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केले. नवीन झाडे लावण्याबाबत आणि असणारी झाडे टिकवण्याबाबत सर्वांनीच अधिक गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चंगळवादी जीवनशैलीने पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे आणि असेच चालू राहिले तर आपल्याला या संकटापासून कोणीही वाचवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश राऊत यांनी विद्यापीठाचे विशाल प्रांगण शहराचे फुफ्फुस म्हणून कार्यरत आहे. ते अधिक चांगल्या पद्धतीने कसे विकसित करता येईल याबद्दलचा आराखडा बनवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. आर्किटेक्ट वंदना पुसाळकर, गार्डन्स क्लबच्या पल्लवी कुलकर्णी, ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले, अजिंक्य बेर्डे यांनीही मते मांडली. प्रा. पल्लवी भोसले, डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. चेतन भोसले यांनी आभार मानले.
...
स्थानिक परिणाम कमी करण्यासाठी उपाय
तापमानवाढीचा स्थानिक परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाय आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यात ऊर्जा बचत, वाहनांचा कमी वापर, इंधन ज्वलन कमी करणे, वृक्ष लागवड करणे, झाडांचे संवर्धन करणे, ए. सी. चा वापर टाळणे, कचरा जाळणे टाळणे, आदी उपायांच्या माध्यमातून शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा कृती कार्यक्रम संघटितपणे राबविण्याचा निर्धार पर्यावरणप्रेमींनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com