मेंदूतील रक्तस्त्रावामुळे सुटले मोटारीवरील नियंत्रण

मेंदूतील रक्तस्त्रावामुळे सुटले मोटारीवरील नियंत्रण

मेंदूतील रक्तस्त्रावामुळे
सुटले मोटारीवरील नियंत्रण
सायबर चौक अपघातः चालक चव्हाणांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः चालकाने नियंत्रण सुटलेल्या भरधाव मोटारीने सायबर चौकात भीषण अपघात घडला. मोटारचालक व्ही. एम. चव्हाण (वय ७२, रा. शाहू टोल नाक्यानजीक) यांच्यासह चौघांचा यामध्ये मृत्यू झाला. चव्हाण हे हृदयविकार व मधुमेहाचे रुग्ण होते. मोटार चालवताना त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्यांची एक बाजू बंद पडल्याचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला. मेंदूत गाठी मिळून आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, चव्हाण यांच्या मुली परदेशातून आल्यानंतर बुधवारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या ताब्यातील मोटारीचा ताबा सुटून सोमवारी सायबर चौकात अपघात घडला. या भरधाव मोटारीने चार दुचाकींना दिलेल्या धडकेत हर्षद पाटील (वय १६), प्रथमेश पाटील (१९ दोघे रा. दौलतनगर), अनिकेत चौगुले (२५, रा. आसुर्ले पोर्ले) यांचा मृत्यू झाला होता.
चव्हाण यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली होती. त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटण्यामागील नेमके कारण उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. हा अहवाल बुधवारी राजारामपुरी पोलिसांना प्राप्त झाला. चव्हाण यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी मिळून आल्याने अपघातापूर्वी मोठ्या प्रमाणात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांची एक बाजू बंद पडून हृदयाचे कामही हळूहळू बंद झाले. दरम्यान, त्यांच्या दोन्ही मुली परदेशातून येणार असल्याने मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आला होता. बुधवारी दोन्ही मुली, मुलाच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com