गड-शेळ्या-मेंढ्या टॅगिंग

गड-शेळ्या-मेंढ्या टॅगिंग

टॅग एका नराला, बाकी पात्र नोंदणीला
शेळ्या-मेंढ्यांचे ईअर टॅगिंग : आयुर्मान कमी असल्याने घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ८ : पशुसंवर्धन विभागाने गाय, म्हशीप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंगची (बाराअंकी बारकोड) सक्ती केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना अडचणी लक्षात येत आहेत. शेळ्या-मेंढ्यांचे कमी आर्युमान असल्याने टॅगिंगचे काम सातत्याने करावे लागणार होते. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा विचार करुन एका नराला टॅगिंग केल्यानंतर त्यावरच संबंधित मेंढपाळ, शेतकऱ्याच्या अन्य शेळ्या-मेंढ्यांची गट नोंदणी केली जाणार आहे.
शासनाने नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाय व म्हैस वर्ग जनावरांना ईअर टॅगिंग करण्यात आले आहे. जनावरांना उपचारासाठी देण्यात येणाऱ्या औषधावरुन त्या भागात संभाव्य साथीच्या आजारांचा अंदाज लावणे सोपे व्हावे, हा यामागील उद्देश आहे. ईअर टॅगिंगच्या आधारावर शासनाच्या सुविधा व योजनांसह आवश्यक सेवा पुरविणे शक्य होणार आहे. त्यामुळेच ईअर टॅगिंग नसणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर १ जूनपासून निर्बंध घातले आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईही न देण्याचा निर्णय घेतला आहे आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे. पण, या निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी दिसून येऊ लागल्या. मूळात पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. गाय, म्हशीच्या टॅगिंगसाठी खासगी दूध संघाच्या पशुवैद्यकांची मदत घेतली होती. इथे तशी परिस्थिती नाही. शिवाय शेळ्या-मेंढ्यांचे आयुर्मानही कमी असते. तर प्रजनन काळही कमी आहे. त्यामुळे टॅगिंगची प्रक्रिया सातत्याने राबवावी लागेल. याचा विचार करुन महत्त्वाचा बदल केला आहे. मेंढपाळ, शेतकऱ्याकडील एका नराच्या टॅगवर त्यांच्याकडील सर्व शेळ्या-मेंढ्यांची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार बऱ्याच प्रमाणात हलका होणार आहे.

चौकट...
* जिथे एकापेक्षा अधिक...
शेळ्या-मेंढ्यांच्या ईअर टॅगिंगसाठी गटनोंदणी चालणार आहे. ज्या शेतकरी, मेंढपाळाकडे एकापेक्षा अधिक शेळ्या-मेंढया आहेत तिथे अशा पद्धतीने ईअर टॅगिंग केले जाणार आहे. एखाद्या मेंढपाळाकडे २०० शेळ्या-मेंढ्या आहेत. तर त्यातील एका नराला टॅग मारला जाईल. त्यावर त्या मेंढपाळाकडे तीन महिन्याच्या आतील आणि तीन महिन्यावरील किती शेळ्या-मेंढ्या आहेत त्याची नोंदणी केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com