रस्ता काम बंद पाडले

रस्ता काम बंद पाडले

माऊली चौक ते गोखले कॉलेज
रस्ता काम नागरिकांनी पाडले बंद

भाजप राजारामपुरी मंडलतर्फे निवेदन

कोल्हापूर, ता. ७ ः माऊली चौक ते गोखले कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावर गटारी केल्यानंतरच डांबरीकरण करावे यासाठी परिसरातील नागरिकांनी आज रस्त्याचे काम बंद पाडले. त्यानंतर गटारी करण्याचे आश्‍वासन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले. दरम्यान, भाजपच्या राजारामपुरी मंडलतर्फे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, असे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिले.
या रस्त्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन व मॅनहोलचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी डांबरीकरण सुरू आहे. या पूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूस गटार नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाऊन रस्ता खराब होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे प्रथम गटारी करा, असे परिसरातील कार्यकर्त्यांनी ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. तीन महिन्यांपूर्वी गटारीचे लेखी आश्वासन दिले होते; पण ते काम अजून सुरू नसल्याने ठेकेदार कंपनीचे सुपरवायझर सत्तार मुल्ला यांना परिसरातील कार्यकर्त्यांनी जाब विचारत काम बंद पाडले. गटारीनंतरच डांबरीकरण करा अशी भूमिका मांडली. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते फिरोज मुजावर, पांजरपोळ इंडस्ट्रीज अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी तसेच अन्य कारखानदारांचा समावेश होता. त्यावेळी गटारीचे काम करण्याचे आश्‍वासन मुल्ला यांनी दिले.
भाजप राजारामपुरी मंडलतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रस्ता बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य कार्यवाही करून तातडीने रस्ता खुला करावा; अन्यथा रास्ता रोको वा अन्य आंदोलन केले जाईल. यावेळी रविकिरण गवळी, रोहित पोवार, महादेव बिरजे, गौरव सातपुते आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com