फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून ५१ तोळे सोने लुबाडले

फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून ५१ तोळे सोने लुबाडले

अल्पवयीन मुलीकडून ५१ तोळे दागिने लुबाडले
छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी; परप्रांतीय तरुणावर गुन्हा


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला तिची छायाचित्रे व्हायरल करण्याची भीती दाखवून परप्रांतीय तरुणाने ५१ तोळे सोने लुबाडले. याप्रकरणी बनीदास नावाच्या संशयिताविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १९ एप्रिल ते २५ मे कालावधीत हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल महिन्यात बनीदास याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित अल्पवयीन मुलीशी ओळख केली. सुरूवातीला मैत्रीतील बोलणे पुढे प्रेमापर्यंत गेले. त्या तरुणाने स्वतः एका अडचणीत अडकल्याचे भासवून संबंधित मुलीकडून पैशांची मागणी सुरू केली. तसेच कोल्हापुरात भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

कोल्हापुरात येऊन नेले दागिने...
बनीदास याने कोल्हापुरात येऊन या मुलीशी संपर्क केला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मैदानावर तसेच ताराबाई पार्कातील एका आलिशान हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. तिच्यासोबत फोटोही काढले. या वेळी मुलीकडून १५ तोळ्यांचा सोन्याचा हार घेऊन तो परत गेला होता. त्यानंतर त्याने मुलीकडे आणखीन दागिन्यांचा हट्ट धरला.

फोटो एडीट करून ब्लॅकमेलिंग
कोल्हापुरात काढलेल्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून बनीदासने ती छायाचित्रे तिला पाठवली. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुलीला घरातून आणखीन दागिने आणण्यास भाग पाडले. बदनामी टाळण्यासाठी मुलीने पंधरा दिवसांच्या कालावधीत घरातील आणखीन दागिने त्याला दिले. यानंतरही त्याचा दबाव वाढत गेल्याने मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. यानंतर मुलीच्या वडिलांनी ५१ तोळे दागिने लुबाडल्याची फिर्याद दाखल केली.

या दागिन्यांचा समावेश...
१५ तोळे वजनाचे दोन नेकलेस, अमेरिकन डायमंडच्या कानातील रिंगा, सहा तोळ्यांच्या बांगड्या, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट, तीन तोळ्यांच्या दोन सोनसाखळ्या, चार तोळ्यांचा नेकलेस, अडीच तोळ्यांच्या कानातील पाच रिंगा, नऊ ग्रॅमची सोन्याची नऊ नाणी, तीन तोळ्यांचे मंगळसूत्रामधील पेंडेट असे २५ लाख ९५ हजारांच्या ऐवज संशयिताने लुबाडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com