कार्गो सेवा दिवाळीपासून शक्य

कार्गो सेवा दिवाळीपासून शक्य

कोल्हापूर विमानतळावरून
कार्गो सेवेला दिवाळीचा मुहूर्त
अग्निप्रतिबंधक, सुरक्षेसंदर्भातील अहवाल सादर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ कोल्हापूर विमानतळावरील बहुचर्चित कार्गो सेवेला दसरा-दिवाळीचा मुहूर्त मिळणार आहे. त्यासाठी आवश्‍यक अहवाल आणि प्राथमिक बाबींची पूर्तता झाली आहे. अग्निप्रतिबंधक आणि सुरक्षेसंदर्भातील आवश्‍यक अहवाल दिला असून त्याला मंजुरी मिळताच कार्गो सेवा सुरू होणार आहे. यासाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
कोल्हापूर विमानतळावर कार्गो सेवा सुरू होण्यासाठी नवीन इमारत होणे आवश्‍यक होते. अलीकडेच हे काम पूर्ण झाले असून जुनी इमारत कार्गो सेवेसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र आग प्रतिबंधक व्यवस्था, सुरक्षेच्या अटींची पूर्तता केल्यानंतरच ही सेवा प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकते. यासाठीचा संपूर्ण अहवाल संबंधित यंत्रणेकडून पाठवण्यात आला आहे. या अहवालातील तांत्रिक बाबींची पाहणी, सुधारणा करून तो मंजूर होण्यासाठी साधारण तीन महिने लागणार आहेत. सुमारे हजार चौरस फुटांची ही व्यवस्था असणार आहे. तेथे शीतगृहांची आदींची व्यवस्था नंतर होईल. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसाधारण मालाची वाहतूक होणे शक्य असल्याचे विमानतळाचे संचालक शिंदे यांनी सांगितले.

व्यापार, उद्योगाला चालना
कार्गो सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर कोल्हापुरातील शेतीमालाची वाहतूक हवाई मार्गाने होऊ शकते. परिणामी कोल्हापूर इतर महानगरांशी जोडले जाणार आहे. यातून व्यापार आणि उद्योग वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. यातून कळत न कळत कोल्हापुरातील उत्पादने अन्य राज्यांत सहज पोहोचणार आहेत. येथील उद्योगांचे विस्तारीकरणाला संधी मिळणार आहे.

कोल्हापुरातून सध्या हैदराबाद, बंगळूर, तिरुपती अशा ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. या फेऱ्यांद्वारे महिन्याला सुमारे शंभर किलो चांदीची वाहतूक केली जाते. यासाठी आवश्‍यक अटींची पूर्तता करून ही सेवा सुरू आहे; मात्र उर्वरित मालासाठी कार्गो सेवेचे स्वतंत्र केंद्र असणार आहे. त्यासाठीची सर्व कागदोपत्री, मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. फुले, ताजे अन्न आदींच्या माल वाहतुकीसाठी स्वतंत्र केंद्राद्वारे नियोजन होणार आहे. त्यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने जागेचे विस्तारीकरण होणार आहे.
- अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com