कोल्हापूरसह सांगलीतील पावणे नऊ हजार घरांवर सौर रूफ टॉप

कोल्हापूरसह सांगलीतील पावणे नऊ हजार घरांवर सौर रूफ टॉप

वीज बील शून्य अन् जास्तीची वीज महावितरणला
सौर रुफ टॉप योजनेकडे वाढता कल; कोल्हापूर विभागात आठ हजारांवर ग्राहकांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : वीज बिलाचे आकडे बघून अनेक ग्राहकांना धक्का बसू लागला आहे. मात्र, व्यवहाराची सांगड घालणाऱ्या कोल्हापूरसह सांगलीतील आठ हजार ७४० ग्राहकांनी थेट घरावर सौर रुफ टॉप बसवून घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या वीज बिलात प्रतिमहिना ५५० रुपयांची बचत होत असून, उर्वरित जास्तीची वीज महावितरणला दिल्यामुळे वीज बिलही शून्यासह मोफत विजेचा लाभ त्यांना मिळत आहे. यात काही गृहनिर्माण संस्था, संकुलांचाही समावेश आहे.
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यात गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यास वीजबील शून्य येते. अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळते. केंद्र सरकारतर्फे यापूर्वी प्रधानमंत्री-सूर्यधर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात विनाअनुदानित व अनुदानित तत्त्वावर घरगुती व इतर वर्गवारीतील एकूण पाच हजार ७८५ ग्राहकांनी ७८.८५ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. सांगली जिल्ह्यात याच पद्धतीने २९९५ ग्राहकांनी ४३.८३ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण आठ हजार ७४० घरांवर हा प्रकल्पाद्वारे १२२ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे या ग्राहकांना वीज बिल शून्य आले असून त्यांनी जास्तीची वीज महावितरणला विकून फायदा मिळवला आहे. महावितरणने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
----------------
कोट
वर्षभरात सात ते दहा हजार रुपयांची बचत या सौर रूफ टॉप बसविण्यामुळे झाली आहे. एकदाच पैसे घातल्यानंतर अनेक वर्षे यातून लाभ मिळेल.
- संजय पाटील, उंचगाव, ग्राहक
-----------------
दृष्टिक्षेपात
- कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ७१ हजार ४००, तर सांगली जिल्ह्यात एक लाख १४ हजार ५०० घरावर सौर यंत्रणा बसविण्याचे लक्ष्य आहे
- तेरा फेब्रुवारीनंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान
- दोन किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविणाऱ्या ग्राहकांना प्रतिकिलोवॅट ३० हजार, तर एक किलोवॅटला १८ हजार असे ७८ हजार रुपये अनुदान मिळणार
- १५० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना दोन किलोवॅट, तर १५० युनिट वापरणाऱ्यांना एक किलोवॅटची सिस्टीम पुरेशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com