पन्हाळा उपविभागीय कार्यालय
दलाली, बनावटगिरीच्या गर्तेत - भाग ०३

पन्हाळा उपविभागीय कार्यालय दलाली, बनावटगिरीच्या गर्तेत - भाग ०३

लोगो घ्या भाग ०३

बनावट दाखल्यांचा कारभार, ‘महा-ई’चा हातभार
शासकीय दाखल्याच्या ‘पीडीएफ''मध्येही बदल; दुचाकीस्वार एजंटांच्या हाती आलिशान मोटारी

राजेंद्र दळवी ः सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. ११ ः काही वर्षांतील कार्यरत असलेल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या कार्यकाळात पन्हाळ्यातील सरकारी कार्यालयात एजंटांचा राबता वाढला. जणू ते अधिकाऱ्यांचे खासगी चिटणीसच होते. त्यातून एजंटांना सर्वच शासकीय नियम व लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती झाली. दिवसेंदिवस ते यात वाकबगार होत गेले. परिणामी, एजंटांमार्फत येणाऱ्या कागदपत्रांची सरकारी अधिकाऱ्यांकडून कसलीही सत्यताही तपासली जात नव्हती. एजंटांनी दिला म्हणजे तो कागद खरा असेच सूत्र प्रचलित झाले.
जेव्हा एजंटांना या कार्यालयात खोटे पचतंय, याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी बनावट सही-शिक्क्यांच्या कागदपत्रांची निर्मितीच सुरू करण्याचा सपाटा लावला. दरम्यान, परिसरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या. साहजिकच जमीन खरेदी-विक्रीतून एजंटांना मिळणारे कमिशन घटले. यावरही एजंटांनी उपाय शोधला. तो म्हणजे, जमीन बिगरशेती करून प्लॉट पडणे व कजाप करून प्रत्येक प्लॉटचे सात-बारा वेगळे करणे. त्यासाठी पुन्हा टीपी (नगररचना) कार्यालयाकडील झोन दाखला व जमीन मोजणी नकाशाची गरज पडली. तेव्हा काही चतुर एजंटांनी धडधडीत ऑनलाईन झोन दाखलेच बनवले. यावरच ते थांबले नाहीत, तर दुसऱ्या गावांतील मोजणी नकाशा वापरायला सुरवात केली. धडाधड बिगरशेती आदेश व कजाप करायला सुरुवात केली. यासाठी त्यांना बनावट सही करणारे व बनावट कागदपत्रे चालवून घेणाऱ्या काही सरकारी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण साथ मिळाली. त्यातून एजंटांची नजर फक्त बिगरशेती, शेतकरी, दोनशे मीटर दाखलेच नाही तर हळूहळू जातीचे, डोमिसाईल, जातपाडताळणी दाखल्यांकडे वळली. दरम्यान, शासनाने सर्वच दाखले ऑनलाईन केले. या शासन निर्णयाचा बनावटगिरी करणाऱ्या एजंटांचा फायदाच झाला. त्यांनी तालुक्यातील काही महा-ई-सेवा चालकांची मदत घेतली. यामुळे बनावटगिरीत महा-ई-सेवा चालकांचीही ‘एन्ट्री’ झाली. त्यांच्या माध्यमातून शासनाकडून दिलेल्या दाखल्याच्या ‘पीडीएफ''मध्ये बदल करण्याचा नवीन फंडा सुरू झाला. दाखल्यांसाठी प्रतिशासनच तयार केले. या माध्यमातून दलाल, खोटी कागदपत्रे तयार करणारे एजंट मालामाल झाले. सुरवातीला दुचाकीवरून फिरणाके दोन-चार वर्षांतच दोन-दोन आलिशान मोटारीतून सैरसपाटा मारताना दिसू लागले.
------
चौकट
शासकीय जमिनीत चक्क प्लॉटिंग
पन्हाळा व शाहूवाडी या दोन्ही तालुक्यांत सर्व बिनबोभाट व्यवसाय सुरू होते. अलीकडेच येथे साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी तहसीलदार म्हणून काम केलेले समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी येथे काम केल्यामुळे त्यांना तालुक्याची नस माहीत होती. ते रुजू झाल्यानंतर त्यांनी दौरा केला. वाडीरत्नागिरी (जोतिबा) येथे गेले असता त्यांनी तेथे पडलेले प्लॉट पहिले व चौकशीला सुरवात केली. चौकशीत शासकीय जमिनीतच प्लॉटिंग झाल्याचे निष्पन्न झाले. माले येथेही प्लॉटिंग केलेले दिसले. मागील अनुभवामुळे चौकशी केली तर तेही बनावटच निघाले.
----------
कोट...
पन्हाळा तालुक्यात उघडकीस आलेले बनावट दाखले व परवान्यांची संख्या विचारात पाडणारी आहे. आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी गुन्हे नोंद केले आहेत. तसेच बनावटगिरीचा समूळ नयनाट करण्यासाठी भविष्यातही वरिष्ठांचा आदेश होताच गुन्हे नोंद करणार आहोत.
- माधवी शिंदे-जाधव, तहसीलदार, पन्हाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com