लालफितीच्या कारभाराने चुकला ‘शाहू’चा नेम

लालफितीच्या कारभाराने चुकला ‘शाहू’चा नेम

89452
शाहू माने
...................

लालफितीच्या कारभाराने चुकला ‘शाहू’चा नेम

रायफल परवाना सहा महिन्यांपासून रखडला ः ‘थ्री पोझिशन’मध्ये चुकले लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ हा अनुभव सर्वसामान्यांना नेहमीच येतो. याचीच अनुभती आंतरराष्ट्रीय नेमबाज व यूथ ऑलिंपिक सुवर्ण विजेता शाहू माने यालाही आली. त्याने सहा महिन्यांपूर्वी थ्री पोझिशनसाठी लागणाऱ्या रायफलचा परवाना जिल्हा प्रशासनाकडे रितसर अर्ज करून मागितला आहे. मात्र, त्याला अद्यापही तो दिलेला नाही. परिणामी सोमवारी (ता. १०) भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला ठराविक प्रकारची रायफल वापरता न आल्याने सुमार कामगिरीला सामोरे जावे लागले.
भारताचा युवा नेमबाज व कोल्हापूरचा सुपुत्र शाहू माने हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेमबाजीत देशाचे नाव करीत आहे. तो १० मीटर एअर पिस्तल प्रकारात विश्‍वचषक, यूथ ऑलिंपिकसह देश-विदेशातील अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी करीत आहे. सध्या तो भोपाळ येथे सुरू असलेल्या कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याने त्याची मक्तेदारी असलेल्या ५० मीटर एअर रायफल प्रकारात ६३१ गुण मिळवून सुवर्ण वेध घेतला. या प्रकारासह तो प्रथमच ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात सहभागी होऊन सुवर्ण वेध घेण्यासाठी सहभागी झाला होता. मात्र, त्याला भाडेतत्त्वावर घेतलेल्या रायफलचे वजन पेलवले नाही आणि त्याचा या प्रकारातील नेम चुकला. त्याचे स्थान २९ व्या स्थानावर घसरले.
पहिल्या दोन प्रकारांत त्याने चांगली कामगिरी केली; पण थ्री पोझिशनमध्ये असे का घडले, असे विचारणा झाली. त्यामुळे खरा प्रकार समोर आला. त्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आर्थिक पाठबळावर जर्मन बनावटीची रायफल घेतली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या रायफलला लागणारा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयात लालफितीत अडकला आहे. त्याने २९ डिसेंबर २०२३ रोजी क्रीडा प्रकारात वापरण्यासाठी रायफलचा परवाना रितसर मागितला आहे. पोलिस प्रशासनाकडूनही त्याची चौकशी झाली. चौकशीचे सकारात्मक टिपणही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. काही दिवसांनंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची जानेवारीत बदली झाली. त्यानंतर नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर काही दिवसांचा कालावधी गेला आणि लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आणि हा परवाना पुन्हा एकदा लालफितीत अडकला.
शाहूने तीन वर्षांपूर्वीही परवाना मागितला होता. मात्र, पात्रता पूर्ण करू शकत नसल्याचे कारण देऊन त्याचा अर्ज निकाली काढला. या सर्व प्रकारामुळे शाहूचे लक्ष्य विचलित होऊ नये, याची काळजी पालकांनी घेतली. त्याला भाडेतत्त्वावर दुसऱ्या रायफलवर सराव करण्यास दिला. मात्र, त्याला अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही.
.........
कोट.....
पोलिस प्रशासनाकडून सकारात्मक टिपणी येऊनही शाहूला सरावासाठी लागणारा थ्री पोझिशनच्या रायफलचा परवाना जिल्हा प्रशासनाकडे अडकला आहे. परवाना प्रलंबित राहिल्याने त्याला नवीन रायफलवर सराव करता येईनासा झाला आहे. त्यामुळे अपेक्षित लक्ष्य गाठताना अडथळे येत आहेत. परवाना लवकर मिळाला तर त्याला आणखी जोमाने सराव करता येईल.
- तुषार माने, नेमबाज शाहूचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com